|| शैलजा तिवले

शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात एआरटी केंद्र;- शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयातील एचआयव्हीग्रस्त रुग्णांना क्षयरोगासोबतच एचआयव्हीचे उपचार मिळावेत यासाठी आता रुग्णालयातच अ‍ॅन्टीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णांना आता केईएम रुग्णालयातील एआरटी केंद्रात करावी लागणारी पायपीट थांबणार आहे.

एचआयव्हीग्रस्त रुग्णांमार्फत एचआयव्हीचा प्रसार होऊ नये म्हणून एआरटी थेरपी दिली जाते. एचआयव्ही आणि क्षयरोग यांचा परस्पर संबंध असून एचआयव्हीग्रस्त रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने त्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. शिवडी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या क्षयरुग्णांमध्ये एचआयव्हीग्रस्त रुग्णदेखील असतात. काही वेळेस क्षयरोगाच्या चाचण्या करताना नव्याने एचआयव्हीग्रस्त रुग्णांचे निदान होते. या रुग्णांना मात्र एचआयव्हीचे उपचार घेण्यासाठी आत्तापर्यंत केईएम रुग्णालयातील एआरटी केंद्रात जावे लागत होते.

काही क्षयरुग्ण अंथरुणाला खिळलेले असतात. काही रुग्णांचे नातेवाईकही फिरकत नाहीत, तर काही रुग्ण हे इतर जिल्ह्य़ातून किंवा परराज्यातून उपचारासाठी येतात. तेव्हा अशा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना केईएममध्ये जाऊन औषधे आणणे सोईस्कर नसते. त्यामुळे मग उपचारांमध्ये दिरंगाई होते. तेव्हा रुग्णांना क्षयरोगासोबतच एचआयव्हीचे उपचार प्राप्त व्हावेत, या उद्देशातून पालिका आणि मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने (एमडॅक्स) क्षयरोग रुग्णालयातच एआरटी केंद्र सुरू केले असल्याचे, एमडॅक्सच्या प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले. १३ ऑगस्ट रोजी या केंद्राचे उद्घाटन झाले असून आत्तापर्यंत चार रुग्णांना उपचारही सुरू झाले आहेत.

खोकला किंवा शिंकण्याच्या माध्यमातून क्षयरोगाचे जंतू पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे किंवा गर्दीतून प्रवास करणे शक्यतो टाळावे. या हेतूनेही हे केंद्र रुग्णालय आवारातच उपलब्ध केलेले आहे. सध्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच एआरटी केंद्राची जबाबदारी दिलेली आहे. तेथील डॉक्टर आणि परिचारिकांना यांचे प्रशिक्षण दिलेले आहे. तसेच औषधाचा साठा उपलब्ध केला आहे.

शिवडी क्षयरोग रुग्णालयातील एचआयव्ही रुग्णांची स्थिती

शिवडी रुग्णालयामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये ३१३ क्षयरुग्णांना एचआयव्ही असल्याचे निदान झाले आहे. यापैकी १८५ रुग्णांवर केईएमच्या एआरटी केंद्रामध्ये उपचार सुरू केले आहेत. यातील १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद एमडॅक्सकडे आहे. तेव्हा यातील १०० हून अधिक रुग्णांनी एचआयव्हीच्या उपचारांकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास येते. बऱ्याचदा रुग्णांचा पाठपुरावा केला जातो. परंतु क्षयरुग्णांमध्ये काही रुग्ण हे बेघर असतात. त्यामुळे त्यांचा पाठपुरावा करणे शक्य नसते. काही रुग्ण हे राज्याबाहेरून आलेले असतात. त्यामुळे क्षयरोगाचे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्थानिक एआरटी केंद्राकडे पाठविले जाते, असे डॉ. आचार्य यांनी स्पष्ट केले.