सुशांत मोरे
स्थानकासाठी नवीन इमारतीची उभारणी
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील शीव स्थानकात कुर्ला दिशेला (पश्चिम) दोन नवीन फलाट बांधण्यात येणार आहेत. तसेच सध्याच्या फलाटांचा विस्तार करण्यासोबतच नवीन स्थानक इमारत या ठिकाणी आकाराला येणार असल्याने शीव स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे. कुर्ला ते परळ पाचवा-सहावा मार्गासाठी कुर्ला ते दादपर्यंतच्या सर्व स्थानकांत मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेतली जाणार असून, सध्या शीव व कुर्ला हार्बर स्थानकातील कामांना गती दिली जात आहे.
मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देतानाच लोकल प्रवास सुकर करण्यासाठी कल्याण ते सीएसएमटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी सध्या कुर्ला ते परळदरम्यान असलेल्या स्थानकांत स्वतंत्र स्थानक व फलाट, रूळ अशी मोठी कामे हाती घेतली आहेत. या दोन्ही मार्गासाठी हार्बर कुर्ला स्थानक हे उन्नत केले जाणार आहे. त्यासाठी सीएसएमटी दिशेने एक किलोमीटपर्यंतचा मार्ग उन्नत केला जाईल. त्यासाठी खांब उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी त्यावर गर्डर उभारले जातील. हे काम करताना कुर्ला स्थानकात सर्व फलाटांना जोडणाऱ्या दोन पादचारी पुलांच्या काही भागावर हातोडादेखील पडणार आहे. उन्नत स्थानक होताच तोडलेल्या पुलांची पुन्हा नव्या हार्बर स्थानकाला जोड देण्यात येणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हार्बर कुर्ला उन्नत झाल्यास त्याखालून पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध होईल.
त्यानंतर याच मार्गासाठी शीव स्थानकातही सध्याच्या दोन फलाटांचा कुर्ला दिशेने विस्तार आणि त्याला समांतर कुर्ला दिशेनेच (पश्चिम बाजूला) दोन नवीन फलाटांची उभारणी केली जाणार आहे. या कामांनाही सुरुवात झाली आहे. दोन नवीन फलाट होताच तेथून अप व डाऊन धिम्या लोकल, तर सध्याच्या एक व दोन नंबर मार्गावरून जलद लोकल जातील. तर पूर्व दिशेला असलेले दोन जलद मार्ग मेल-एक्सप्रेस गाडय़ांसाठी उपलब्ध होतील. याच ठिकाणी शीव स्थानक इमारतही होणार असून त्यामध्ये तिकीट खिडक्यांसह अन्य सुविधा उपलब्ध केल्या जातील. माटुंगा आणि दादरमध्येही असेच काम केले जाणार आहे. परळपर्यंतचा पाचवा-सहावा मार्ग पूर्ण करण्यासाठी २०२१ हे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु शीव स्थानकातील फलाट व कुर्ला हार्बरचे काम वर्षभरात पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
शीव उड्डाणपुलावरही हातोडा
पाचवा-सहावा मार्गात शीव स्थानकात सीएसएमटी दिशेने असलेला उड्डाणपुलाचा भागही येतो. पुलाचे खांब या मार्गात अडथळा येत असल्याने ते काढून पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा नव्या पद्धतीने रुळांवर येणारा उड्डाणपुलाचा भाग उभारला जाईल. यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असून ती मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवे काय?
* शीव स्थानकातील सध्याच्या दोन फलाटांचा कुर्ला दिशेने विस्तार व कुर्ला दिशेनेच आणखी दोन नवीन फलाट
* हार्बर कुर्ला उन्नत मार्गातील दोन पादचारी पुलांवर हातोडा
* नव्या स्थानकाला पुलांची जोड देणार
* कुर्ला ते परळ पाचव्या-सहाव्या मार्गातील कामाला वेग
