उल्हासनगरच्या बाजारपेठांतील निम्मे व्यवहार ठप्प

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवळ मुंबई, ठाणे परिसरच नव्हे तर देशभरातील मोठय़ा बाजारपेठांच्या शहरात गणल्या जाणाऱ्या उल्हासनगरमध्ये सध्या मात्र उदासवाणे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने ५०० आणि एक हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यापासून आजपर्यंतच्या ५० दिवसांत या शहरातील बहुतांश उद्योगांना खीळ बसली आहे. एरवी सदैव गजबजलेल्या अशा या बाजारपेठांमध्ये लग्नसराईच्या हंगामातही शुकशुकाट दिसत आहे. गेल्या ५० दिवसांच्या काळात उल्हासनगरच्या बाजारांतील व्यवहार निम्म्याहून कमी झाल्याचा दावा येथील व्यापारी संघटनेने केला आहे. त्याच वेळी, हा गोंधळ आणखी सहा महिने राहिल्यास येथील उद्योग पूर्णपणे बंद पडतील, असा धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू यांच्या स्वतंत्र बाजारपेठाच असलेल्या उल्हासनगर शहरातून दररोज लाखोंची उलाढाल होत असते. विशेषत: लग्नसराईच्या हंगामात येथील व्यवहार कोटय़वधींच्या घरात जातात. परंतु, ८ नोव्हेंबरपासून या बाजारपेठांतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्यासारखे चित्र आहे, असे फेडरेशन ऑफ सिंधुनगर व्यापारी असोसिएशन’चे अध्यक्ष नरेश दुर्गाणी यांनी सांगितले. उल्हासनगर बाजारपेठेचा विचार करता ती ५० ते ६० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, असेही ते म्हणाले. ‘लग्नसराईच्या हंगामात लग्नपत्रिकेपासून कपडे-भांडी खरेदीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी वऱ्हाडी मंडळी उल्हासनगरच्या बाजारपेठांत फिरत असतात. परंतु, सध्या चलनतुटवडा असल्याने हे चित्र दिसेनासे झाले आहे. दुसरे म्हणजे, सुटय़ा पैशांची टंचाई असल्याने ग्राहकांसोबत दुकानदारांचीही पंचाईत होत आहे,’ अशी माहिती दुर्गाणी यांनी दिली.

सहा महिने तरी मंदी?

उल्हासनगरातील बहुतांश उद्योग लघू स्वरूपाचे असून त्यांना नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या निर्णयाचे परिणाम जितके लांबतील तितके या उद्योगांना व्यापाराच्या क्षेत्रात टिकणे अवघड होईल, अशी भीती दुर्गाणी यांनी व्यक्त केली. मंदीच्या वातावरणामुळे नवीन उत्पादनांच्या निर्मिती तसेच गुंतवणुकीच्या योजना व्यापाऱ्यांनी सहा महिने लांबणीवर टाकल्या आहेत, असे सांगण्यात आले.

‘आम्हाला दुहेरी फटका’

चार-पाच महिन्यांपूर्वीच येथील जवळपास दीड हजारांहून अधिक बांधकामे पालिकेमार्फत पाडण्यात आली होती. यात आमची इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेतील बहुतांश दुकाने नाहीशी झाली. त्या मोठय़ा आर्थिक फटक्यातून आम्ही सावरतो न सावरतो तोच हा निश्चलनीकरणाचा निर्णय आला. त्यामुळे दुकानात गुंतवणूक करावी की वस्तू खरेदीत हा आमच्या पुढे पेच निर्माण झाला, असे येथील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulhasnagar market badly hit by demonetisation