मुंबई : मुलुंडमधील एका नाल्यात सापडलेल्या अज्ञात अंड्यांचा अखेर उलगडा झाला आहे. उष्मायान प्रक्रियेनंतर त्या अंड्यांतून घोरपडीची ५ पिल्ले जन्माला आली आहेत. घटनेमुळे स्थानिक आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
जानेवारी महिन्यात मुलुंड येथील एका नाल्यात साफसफाई करताना ५ अंडी आढळली होती. स्थानिक नागरिकांनी अंडी पाहिल्यानंतर त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. वन कर्मचाऱ्यांनी ती अंडी ताब्यात घेऊन पुढील देखभालीसाठी ‘रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर’ (रॉ) या वन्यप्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडे सुपूर्द केली. त्यानंतर योग्य तापमान आणि आर्द्रता राखून उष्मायान केल्यानंतर आता त्या अंड्यातून घोरपडीची पिल्ले जन्माला आली आहेत.
घोरपड संरक्षित प्राणी आहे. घोरपड ही उपयुक्त कीटकभक्षक प्रजाती असून पर्यावरणीय समतोल राखण्यात तिचे महत्त्वाचे योगदान असते. या पिल्लांना काही दिवस निरिक्षणाखाली ठेवून नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दरम्यान, मुलुंडसारख्या परिसरात नाल्यात घोरपडीसारख्या वन्य प्राण्याची अंडी सापडणे ही आश्चर्यकारक बाब आहे. या परिसरात अजूनही काही प्रमाणात झाडी, ओलसर भूभाग, टेकड्यांच्या आसपासची जागा शिल्लक आहे. घोरपड प्रामुख्याने अशा ठिकाणी आढळते. नाले, ओढे आणि नदी यांच्याजवळ घोरपड अंडी घालते. अंडी मातीखाली दडवता येतील आणि सुरक्षित ठेवता येतील, अशा जागा ती शोधते. नाल्याच्या कडेला असलेली ओलसर माती आणि झुडुपांची आडोशी जागा यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे रॉचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले.
घोरपडीसारख्या वन्यप्राण्यांच्या अंड्यांचे उष्मायन करताना काही धोके तसेच अडचणी निर्माण होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने घोरपडीच्या अंड्यांसाठी विशिष्ट तापमान आवश्यक असते. खूप उष्णतेमुळे अंड्यांना त्रास होऊ शकतो, तर खऊप थंड तापमानामुळे विकास मंदावतो किंवा थांबतो.आर्द्रता कमी झाली, त अंडी कोरडी घडतात जास्त झाली तर बुरशी येते. याचबरोबर अंडी उष्मायानाच्या काळात हलविल्यास भ्रूण मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. तसेच स्वच्छता न राखल्यास अंड्यावर बुरशी किंवा जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो.
यापूर्वी चेंबूरमध्ये मादी घोरपडीला जीवदान
मुंबई वनिविभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये चेंबूर परिसरातून एका मादी घोरपडीला वाचवले होते. तिने ४४ अंडी घातली होती. ही अंडी रॉ संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. २१७ दिवसांच्या उष्मायानानंतर १७ पिल्ले यशस्वीरीत्या उबवण्यात आली.