येत्या वर्षांत संपादकीय पानांत वैविध्यपूर्ण सदरांची मेजवानी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : दैनंदिन घडामोडींची चर्चा, त्यांवरील भाष्य नेहमीचेच; पण त्यासह आणखीही काही हवे, त्याद्वारे ज्ञानाच्या, विचारांच्या निरनिराळ्या क्षेत्रांचे प्रदेश धुंडाळता यावेत या वाचकइच्छेला मान देऊन ‘लोकसत्ता’च्या ‘संपादकीय’ आणि ‘विचार’ पानांवर नेहमीच विविध विषयांना स्थान दिले जाते; ती परंपरा नव्या वर्षांतही कायम राहणार आहे.  सध्याच्या डिजिटल युगात कळीचा बनलेला वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेचा, खासगीपणाच्या अधिकाराचा प्रश्न असो वा बदलते हवामान, जागतिक तापमानवाढ आदींमुळे उद्भवलेल्या पर्यावरणीय समस्या असोत किंवा रोजच्या बातम्यांमधून निसटलेल्या आर्थिक-राजकीय घडामोडी असोत अथवा सांविधानिक मूल्यांची रुजवणूक वा कायद्याचे पेच निर्माण होण्याचे प्रसंग, समाज-संगीत यांच्या आंतरसंबंधांचा वेध ते अगदी परकीयांनी निर्माण केलेले ‘भारतीय ज्ञान’.. यांसारख्या निराळ्या, वाचकांना विचारसमृद्ध करणाऱ्या विषयांना या पानांवर २०२१ मध्ये स्थान मिळणार आहे.

चतु:सूत्रनव्या स्वरूपात..

नव्या वर्षांत ‘चतु:सूत्र’ सदरातून अर्थकारण, राजकारण, न्याय,  विज्ञान व पर्यावरण या विषयांवर अभ्यासपूर्ण भाष्य वाचण्यास मिळेल. येत्या वर्षांत दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘चतु:सूत्र’च्या चार सूत्रधारांपैकी एक आहेत प्रसिद्ध राजकीय विश्लेषक-अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर! महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपातळीवरही डॉ. पळशीकर यांच्या मर्मभेदी विवेचनाकडे वाचक, अभ्यासकांचे लक्ष असते. नव्या वर्षांत ‘चतु:सूत्र’मधील राज्यशास्त्राचे सूत्र ते पुढे नेणार असून समकालीन राजकारणावरील त्यांचे भाष्य राजकीय शहाणीव देणारे ठरेल. यातले दुसरे सूत्र न्याय-कायदा-संविधान यांविषयी असून कायद्याचे तरुण अभ्यासक-लेखक अभिनव चंद्रचूड हे त्या अनुषंगाने लिहितील. इंग्रजी नियतकालिकांतून आणि स्वतंत्रपणे लिहिलेल्या पुस्तकांनी राष्ट्रीय पातळीवर कायद्याचे विवेचक म्हणून ख्यातकीर्त असणारे अभिनव चंद्रचूड हे प्रथमच मराठी लेखमालेतून वाचकभेटीस येत आहेत. याशिवाय नागपूरच्या ‘रुईकर श्रम संस्थे’चे मानद संचालक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांची राज्य, देश आणि जागतिक अर्थकारणावरील लेखमाला आणि पुणे येथील ‘समुचित एन्व्हिरो टेक’च्या संचालक डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांची विज्ञानाचे भान राखत पर्यावरणीय प्रश्नांकडे पाहणारी लेखमालाही ‘चतु:सूत्र’मध्ये वाचण्यास मिळेल.

विदाविशेष..

नव्या वर्षांतील नव्या सदरांपैकी एक- डिजिटल युगातील माहितीचे वहन, त्यातून उद्भवलेले  विदासुरक्षा, खासगीपणाचा अधिकार आदी कळीचे मुद्दे यांतील निरगाठी दर सोमवारी ‘विदाव्यवधान’ या सदरातून अमृतांशु नेरुरकर उकलणार आहेत. संगणक अभियंते असलेल्या अमृतांशु नेरुरकर यांच्याकडे भारतीय केंद्र व राज्यशासने तसेच संयुक्त राष्ट्रे व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर माहिती तंत्रज्ञान सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कामाचा दांडगा अनुभव असून डिजिटल युगातल्या विदासुरक्षा (डेटा-सिक्युरिटी), विदा-गोपनीयता (डेटा-प्रायव्हसी) या प्रश्नांचा वेध घेण्याबरोबरच या क्षेत्रातील भविष्याची दिशाही ते दाखवतील.

अनवट विषयाची ओळख..

ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, विचक्षण अभ्यासक प्रा. प्रदीप आपटे हे ‘त्यांची भारतविद्या’ या सदरातून एका अनवट विषयाची ओळख करून देतील. भारताचा बराच सर्वज्ञात नसणारा, काही अगदी लपून गेलेला इतिहास आणि वारसा अनेक विदेशी मंडळींच्या व्यासंगाने आणि कुतूहलामुळे जगाला ज्ञात झाला; ती ‘भारतविद्या’ आणि ती निर्माण करणारी मंडळी यांची ओळख प्रा. प्रदीप आपटे त्यांच्या दर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातून करून देतील.

संगीत आणि अध्यात्माचा वेध..

शनिवारी आणखी एक पाक्षिक सदर नव्या वर्षांत वाचकभेटीस येईल. ‘स्वरावकाश’ या शीर्षकाच्या सदरात ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम हे संगीत आणि समाज यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेतील. याशिवाय, विसाव्या शतकात नव्याने उदयास आलेल्या आणि काही लयास गेलेल्या राष्ट्रांचा माहितीपूर्ण आढावा घेणारे ‘नवदेशांचा उदयास्त’ हे सुनीत पोतनीस यांचे सदर दर आठवडय़ाला सोमवार ते शुक्रवार वाचण्यास मिळेल. तर संतसाहित्याचे अभ्यासक-अर्थतज्ज्ञ अभय टिळक हे ‘अद्वयबोध’ या सदरातून संतसाहित्याच्या आधाराने अद्वैताचे आध्यात्मिक तत्त्वभान देतील. ‘कुतूहल’चा यंदाचा विषय आहे – गणित आणि सदराच्या समन्वयक आहेत चारुशीला जुईकर!

बुकमार्कमध्ये वेगळे सदर..

फक्त इंग्रजी पुस्तकांना वाहिलेले ‘बुकमार्क’ हे विशेष पान दर शनिवारी असेलच; पण नव्या वर्षांत त्यावर ‘डिस्टोपियन’ पुस्तकांची ओळख करून देणारे पाक्षिक सदरही वाचकभेटीस येणार आहे.

वाचकप्रिय स्तंभ..

आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण ठरलेल्या मुद्दय़ांचे जागतिक माध्यमांत उमटलेले तरंग दाखवून देणारे ‘विश्वाचे वृत्तरंग’ हा स्तंभ कायम राहणार असून, भारतातील विविध राज्यांतील स्पंदने टिपणारे ‘राज्यावलोकन’ हे साप्ताहिक सदर ‘रविवार विशेष’च्या पानांवर वाचकभेटीस येत आहे. तसेच ‘चाँदनी चौकातून’ हे चौफेर कटाक्ष टाकणारे ‘रविवार विशेष’मधील सदर, राजधानी दिल्लीतून देशाचाही वेध घेणारे ‘लालकिल्ला’, केंद्र आणि राज्यातील सरकार आणि राज्यकर्ते यांची बाजू मांडणारे ‘पहिली बाजू’, धोरणकर्त्यांना अनुभवाचे बोल सुनावणारे ‘समोरच्या बाकावरून’ ही सदरे; शिवाय ‘अन्वयार्थ’, ‘उलटा चष्मा’ आणि ‘व्यक्तिवेध’ हे स्तंभ आणि वाचकांना अभिव्यक्त होण्यास ‘लोकमानस’ पत्रस्तंभदेखील २०२१ मध्ये आहेच.

२०२१मध्ये काय? नव्या

वर्षांत, ‘लोकसत्ता’च्या नित्य वाचकांना परिचित/अपरिचित असे एकंदर दहा लेखक सात सदरांमधून वाचकांच्या भेटीस येतील. त्याव्यतिरिक्त, ‘कुतूहल’सह अन्य चार सदरे आणि पाच स्तंभ कायम राहतील. ‘चतु:सूत्र’ हा एकाच सदरातून चार विविध, तरीही आंतरसंबंधित अशा विषयांवरील चार लेखमालांचा वर्षभर चाललेला लेखनप्रयोग नव्या वर्षांतही सुरूच राहील. पण नवे विषय आणि नव्या लेखकांसह.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various types of article in the loksatta editorial pages in the coming years zws