‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी’ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या तीन उर्दू कविता तसेच सावरकरांच्या मूळ मराठी कवितांच्या हिंदीतील रूपांतराची ध्वनिफित प्रकाशित होत आहे. स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकातर्फे तयार करण्यात आलेल्या ध्वनिफितीमधील या कविता हिंदी-मराठीतील नामवंत गायकांनी गायल्या आहेत. त्यांच्या आधीचे निवेदन दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी केले आहे. ध्वनिफितीची संहिता व लेखन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक वेद राही यांनी केले आहे.
सावरकर अंदमान येथे जन्मठेप भोगत असताना उर्दू शिकले होते. तेथे त्यांनी उर्दूत काव्यरचनाही केली होती. त्यांनी उर्दूत लिहिलेल्या दोन गझल व एक कविता असलेली वही स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांना मिळाली. या गझल व एक कविता आणि सावरकरांनी मराठीत लिहिलेल्या अन्य काही कवितांचे हिंदी भाषांतर अशी दहा गाणी या ध्वनिफितीमध्ये आहेत. या सर्व रचना सुरेश वाडकर, शंकर महादेवन, साधना सरगम, शान, जावेद अली, वैशाली सामंत, राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, डॉ. जसदीप नरुला आणि भरत बल्लवल्ली यांनी गायल्या आहेत. बल्लवल्ली यांनीच या सर्व कविता संगीतबद्ध केल्या आहेत. ‘अनादी मी अनंत मी’, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे’ आणि अन्य मराठी कविता हिंदीत ऐकायला मिळतील.  
ध्वनिफितीचे प्रकाशन दादर पश्चिमेकडील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता होईल.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सावरकरांच्या कवितांच्या ध्वनिफितीचे निवेदन अमिताभ बच्चन यांनी करावे अशी विनंती स्मारकातर्फे त्यांना करण्यात आली होती. सावरकरांबद्दलच्या आदरामुळे बच्चन यांनी विनंतीला मान देऊन ध्वनिफितीसाठी आपला आवाज दिला. – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved rahi scripts intro to savarkars urdu album amitabh recites it