मुंबई : परदेशात उच्च शिक्षणासाठी व नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पडताळणी करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ‘ई – व्हेरीफिकेशन’ची लिंक गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बंद आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना वेळेत पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसून संबंधित देशांचा ‘व्हिसा’ मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बहुसंख्य विद्यार्थी हे नोकरीसाठी तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जात असतात. परदेशात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संबंधित देशाच्या व्हिसासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थी हे ऑनलाइन पडताळणीसाठी https://univ.secur.co.in/verification या संकेतस्थळावर गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र अपलोड करतात. या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यास ‘पडताळणी प्रमाणपत्र’ ई-मेल द्वारे पाठवते. तसेच सर्व कागदपत्रांची पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची यादीही मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पाठविली जाते. त्यानंतर विद्यार्थी हे मंत्रालयात जाऊन पडताळणी प्रमाणपत्रावर शिक्का मिळवतात. हे पडताळणी प्रमाणपत्र व्हिसा मिळवण्याच्या प्रकियेत अत्यंत महत्वाचे असते. परंतु ‘ई – पडताळणी’ची लिंकच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

हेही वाचा – जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड, मुंबईत विविध ठिकाणी १० ते २० टक्के कपात

‘मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ‘ई – पडताळणी’ची लिंक ही दहा ते पंधरा दिवसांपासून बंद आहे, मात्र विद्यापीठ प्रशासन त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसून कोणालाही स्पष्ट माहिती नाही. कलिना संकुलात गेल्यानंतर अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नाही. ‘ई – पडताळणी’ची लिंक बंद असल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी हे उच्च शिक्षण व नोकरीला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिसा मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे’, अशी खंत एका विद्यार्थिनीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

हेही वाचा – मुंबईस्थित कोकणवासिय गेले कोकणात

‘शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी मुंबई विद्यापीठाची प्रमाणपत्र पडताळणीची संकेतस्थळावरील ऑनलाइन सुविधा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. विद्यापीठाच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विद्यापीठाबद्दल प्रचंड रोष आहे. यासंदर्भात ‘अभाविप’ने विद्यापीठासोबत पत्रव्यवहार करून संकेतस्थळावरील लिंक लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे’, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबई महानगरमंत्री निधी गाला यांनी सांगितले.