‘इंडियन मुजाहिद्दिन’च्या दहशतवाद्यांकडून संपर्कासाठी मोबाइलऐवजी अन्य अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात होता, याला वकासच्या अटकेनंतर दुजोरा मिळाला आहे. इंडियन मुजाहिद्दिनचा प्रमुख म्होरक्या यासिन भटकळ याच्याशी संपर्कात राहण्यासाठी वकास शेख या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून स्काईप या आधुनिक संपर्क यंत्रणेचा वापर केला जात होता, अशी माहिती आता बाहेर आली आहे. या माहितीला यासिनने याआधीच दुजोरा दिला होता. परंतु अत्याधुनिक संपर्काची साधने सांगण्यास त्याने नकार दिला होता.
सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वकासकडून अधिक माहिती काढण्यासाठी तसेच भविष्यात त्याचा ताबा मिळावा, यासाठी राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाचे एक पथक रविवारी रात्रीच दिल्लीला गेले आहे. वकास तब्बल अडीच महिने मुंबईत होता. ऑपेरा हाऊसमधील एका माजी आमदाराच्या व्यायायशाळेत रीतसर नोकरी करणाऱ्या वकासचा मुंबई पोलिसांना तसेच गुप्तचर यंत्रणेलाही सुगावा लागला नव्हता.
शनिवारी रात्री अजमेर रेल्वे स्थानकाबाहेर पकडला गेलेला वकास हा वांद्रे येथून आलेल्या एक्स्प्रेसनेच आला होता. याचा अर्थ त्यावेळीही तो मुंबईत होता का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ‘मोठा भाई’ म्हणून इंडियन मुजाहिद्दिनच्या दहशतवाद्यांमध्ये परिचित असलेल्या वकासवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुप्तचर विभाग, दिल्ली पोलीस आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग यांनी संयुक्त कारवाईत भायखळ्याच्या हबीब मंजिल इमारतीवर पाळत ठेवली होती. त्यावेळी राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाला विश्वासात घेण्यात आले असते तर कदाचित यासिन आणि वकास एकाचवेळी सापडले असते, असा दावा सूत्रांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waqus hussain using skype app