महिनाभर पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्य़ांमधील १३ तालुक्यांवर पुन्हा दुष्काळाचे सावट पडले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने चारा व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या चार जिल्ह्य़ांमध्ये ३० सप्टेंबपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी राज्यातील पिकपाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ३५५ तालुक्यांपैकी २८५ तालुक्यांमध्ये १०० टक्क्य़ांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ५५ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के आणि १५ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. पावसाने ओढ दिल्याने टॅंकच्या संख्येतही किंचितशी वाढ झाली आहे. राज्यात सध्या ८२३ गावे आणि ४३२० वाडय़ांना १०४२ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
गेल्या वर्षी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. यंदा पावसाने सुरुवात चांगली केली. परंतु गेला महिनाभर पावसाने पाठ फिरविली आहे, त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. या भागातील पुणे जिल्ह्य़ातील बारामती, इंदापूर, दौंड, सातारा जिल्ह्य़ातील फलटण, मान, खटाव, सांगलीतील जत, कवठे महंकाळ, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्य़ांमधील सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर या १३ तालुक्यांमध्ये टंचाई परिस्थिी गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Sep 2013 रोजी प्रकाशित
पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचे सावट
महिनाभर पावसाने ओढ दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्य़ांमधील १३ तालुक्यांवर पुन्हा दुष्काळाचे सावट पडले आहे.
First published on: 05-09-2013 at 03:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West maharashtra again in drought shade