१८० फेऱ्यांचे नियोजन; सर्वाधिक फेऱ्या अंधेरी ते विरार दरम्यान
मुंबई : प्रवाशांची वाढती संख्या, त्यातही अंधेरी ते विरार पट्टय़ात गर्दीमुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप पाहता या मार्गावर १५ डबा गाडय़ांच्या जास्तीत जास्त फेऱ्या चालविण्याला प्राध्यान्य दिले जाणार आहे. येत्या वर्षांत पश्चिम रेल्वेच्या सेवेत येणाऱ्या १५ डब्यांच्या १५ गाडय़ा याच पट्टय़ात चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे १५ डबा गाडय़ांच्या तब्बल १८० फेऱ्या पश्चिम उपनगरवासीय प्रवाशांच्या वाटय़ाला येतील.
पश्चिम रेल्वेचे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आलेले रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्याशी पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला. अंधेरी ते विरापर्यंत फलाटांची लांबी वाढवून धीम्या मार्गावर १५ डबा लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला होता. त्यानुसार याच मार्गावर सर्वाधिक लोकल गाडय़ा चालवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत १२ डबा लोकल गाडय़ांबरोबर १५ डबा लोकल गाडय़ाही चालवण्यात येत आहेत. एकूण दररोज १३५५ लोकल फेऱ्या होत असून यामध्ये चार १५ डबा लोकल गाडय़ांच्या ५४ फेऱ्या होतात. यापूर्वी तीन पंधरा डबा लोकलच्या ४२ फेऱ्या होत होत्या. त्यानंतर यात नुकतीच वाढ करण्यात आली. ही वाढ करण्यात आली असली तरी ती पुरेशी नाही. खास करून अंधेरी ते विरार पट्टय़ात वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे गर्दीतून प्रवास करताना या भागातील प्रवाशांच्या चांगलेच नाकीनऊ येतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेने आणखी पंधरा डबा लोकल चालविण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. पुढील वर्षांपर्यंत बारा डबा लोकल गाडय़ांना आणखी तीन डबे जोडून पंधरा डबा लोकल चालवण्यात येणार आहेत. अशा पंधरा लोकल गाडय़ा ताफ्यात येणार असून त्यांच्या एकूण १८० लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पंधरा डबा लोकल गाडय़ा जलद चालवतानाच अंधेरी ते विरापर्यंत धीम्या मार्गावरही अधिकाधिक १५ डबा चालवण्याचाही पश्चिम रेल्वेने आधीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार या स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील फलाटांची लांबी वाढवण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्याचे काम सुरू झाले असून फलाटांची लांबी आणि अन्य तांत्रिक कामे करण्यासाठीही एकूण ५९ कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. ही कामे पूर्ण होताच पंधरा डबा लोकल धीम्या मार्गावरही चालवण्यात येणार आहेत.
* पश्चिम रेल्वेकडून १५ डब्यांच्या आणखी १५ लोकल गाडय़ा चालवण्यात येणार असल्या तरी त्यांना १८ लोकल गाडय़ांची गरज असल्याचे सांगण्यात आले.
* अंधेरी ते विरापर्यंत धीम्या मार्गावरील जवळपास १४ स्थानकांतील ३१ फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे.