नववर्ष साजरे करण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा घरी परतणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पश्चिम रेल्वेने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आठ विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चगेट-विरार-चर्चगेट मार्गावर या फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या धीम्या असतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : नाकावाटे देण्याची ‘इन्कोव्हॅक’ लस फक्त खासगी रुग्णालयातच

चर्चगेटहून विरारसाठी मध्यरात्री सव्वाएक वाजता, मध्यरात्री दोन, मध्यरात्री अडीच आणि पहाटे ३.२५ वाजता लोकल सुटणार आहे. तर विरारहून चर्चगेट स्थानकासाठी मध्यरात्री सव्वाबारा वाजता, मध्यरात्री पावणेएक, मध्यरात्री १.४० वाजता आणि पहाटे ३.११ वाजता लोकल सोडण्यात येणार आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई शहर आणि उपनगरवासीय घराबाहेर पडतात. त्यांना घरी परतण्यासाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी दरवर्षी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येते. मध्य रेल्वेकडूनही विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तर बेस्ट उपक्रमाकडूनही या दिवशी जादा बसगाड्या सोडण्यात येतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway to run eight special local trains during midnight of 31st december mumbai print news zws