राज्यात नागरीकरणाचा वेग वाढत असताना जमिनीच्या व्यवहारापासून ते काही ठिकाणी उद्योग-सेवा क्षेत्राच्या विस्तारातून मोठय़ा प्रमाणात संपत्तीची निर्मिती होत आहे. नागरीकरणाच्या ओघात पैशांची निर्मिती होत असताना त्याचे सांस्कृतिक परिणामही दिसून येत आहेत. शहराचे सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व पैसा-मुजोरीच्या खेळात हरवत आहे किंवा नव्याने शहरात घुसत असलेल्या परिसरात सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे ना धड ग्रामीण ना धड नागरी असे बिनचेहऱ्याचे नागरी पट्टे निर्माण होत असून ‘या अर्धनागरीकरणाची संस्कृती काय?’ असा प्रश्न निर्माण होत आहे. याच विषयाचा वेध ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या चर्चासत्राच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात घेण्यात येणार आहे.
बदलणाऱ्या महाराष्ट्राचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि सारस्वत बँकेने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वात ‘अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या विषयावर ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी चर्चासत्र होणार आहे. नियोजनशून्य नागरीकरणामुळे राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रांवर होत असलेल्या परिणामांचा वेध यात घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर केवळ समस्यांची उजळणी न करता उपाययोजनांची-पर्यायांची चर्चाही होणार आहे.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘या अर्धनागरीकरणाची संस्कृती काय?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. तालुक्याची शहरे, छोटय़ा महानगरपालिकांचे आणि मोठय़ा महानगरालगतच्या शहरांचे आकार झपाटय़ाने वाढत आहेत. लोकांच्या हाती पैसा येत आहे. अनेकदा स्थानिकांच्या हाती जमीन विकून झटक्यात कोटींची रक्कम पडत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पैसा आहे पण त्याच्या योग्य वापराचे भान नाही, असे चित्र दिसू लागले आहे.
आर्थिक समृद्धीतून सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक स्तर उंचावण्याचे प्रयत्न करण्याऐवजी व्यसनापासून-मुजोरीचे प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे.
पैशाचे-संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन दिसत आहे. बायकांऐवजी पुरुषच अंगभर सोन्याने मढत आहेत. कुठे सोन्याचा शर्ट कर, तर कुठे लाखोंच्या बक्षिसांचे आमिष दाखवत तरुणांना अशक्यप्राय उंचीच्या दहीहंडी फोडण्याचा जीवघेणा खेळ करण्यास प्रवृत्त कर, असे भयंकर खेळ खेळले जात आहेत. त्यातूनच शहराला सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व नसणे वा ते या पैसा आणि अरेरावीच्या खेळात हरवून जाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व गोष्टींचा वेध या सत्रात घेण्यात येईल.