मुंबई, नवी मुंबईसह ठाणे क्षेत्रात वीजपुरवठा खंडित होण्याची घटना १२ ऑक्टोबरला घडली होती. त्यावेळी मुंबईची आयलँडिंग यंत्रणा का कार्यान्वित होऊ शकली नाही, तुमचे वीजनिर्मिती संच का बंद पडले, असे सवाल करत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील वीज संकटावेळी रेल्वेसह अत्यावश्यक सेवेचा वीजपुरवठाही काही कालावधीसाठी बंद झाला होता. या अनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी सोमवारी ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राला (एसएलडीसी) भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

वीज पारेषण यंत्रणेत भार प्रेषण केंद्राची भूमिका मोलाची असते. त्या दिवशीचा घटनाक्रम आणि एसएलडीसीचे कामकाज कसे चालते याची माहिती घेण्यासाठी आज ऊर्जामंत्र्यांनी भेट दिली. यावेळी टाटा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मुंबईची आयलँडिंग यंत्रणा नेमकी काय आहे १२ ऑक्टोबर रोजी काय घडले याचे सादरीकरण केले.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या चारपैकी तीन ४०० केव्ही वाहिन्या बंद पडल्याने आणि चौथ्या वाहिनीवर अतिरिक्त भार आल्याने बंद करावी लागली. त्यामुळे मुंबईची आयलँडिंग यंत्रणा सुरू होणे अपेक्षित असताना ती सुरू न झाल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता. याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे वीजसंच तातडीने का सुरू होऊ शकले नाहीत असा सवाल केला.

मुंबईला बाहेरून सुरळीत वीजपुरवठा करणे आणि बाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीजपुरवठा करण्यासाठी आयलँडिंग यंत्रणा सुरळीत ठेवणे आवश्यक असताना ती सुरू होऊ शकली नाही. यातील त्रुटी शोधून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली आहे. त्यांच्या अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did tata system collapse during the mumbai power crisis abn