पूर्ववैमनस्यातून कांदिवली येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या बहिणीवर गोळीबार करण्यात आला. बुधवारी रात्री ही घटना घडली. मात्र सुदैवाने या गोळीबारात खातून शेख ही महिला थोडक्यात बचावली आहे. कांदिवलीच्या केडी कंपाऊड येथे खातून शेख (५०) राहतात. बुधवारी रात्री त्यांच्या घरी कालिया नावाचा एक इसम आपल्या साथीदारांसह आला. त्याने खातून शेख यांच्याकडे त्यांच्या भावाबाबत विचारणा केली आणि अचानक गोळीबार सुरू केला.
या गोळीबारात शेख थोडक्यात बचावल्या. आवाजाने परिसरातील नागरिक जमा झाल्यानंतर आरोपींनी पळ काढला. खातून शेख यांचा भाऊ बांधकाम व्यावसायिक आहे. कालिया त्यांच्याकडे पूर्वी वाहनचालक म्हणून कामाला होता. त्याला कामावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच या हल्ल्याचा प्रयत्न झाला असावा, अशी शक्यता कांदिवली पोलिसांनी व्यक्त केली.