मन शांत तर समाज सशक्त…
मुंबई : ‘आपण ठीक आहोत’ हे वाक्य आता अनेकांच्या जीवनातील मुखवटा ठरत चालले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार जगातील सुमारे आठपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त आहे. भारतात ही परिस्थिती अधिक गंभीर असून सुमारे १० कोटींहून अधिक नागरिक कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील मानसिक आजारांचा सामना करत आहेत. कोविडनंतर वाढलेली चिंता, नैराश्य, ताण आणि सामाजिक एकटेपणा हे या स्थितीचे प्रमुख कारण ठरत आहेत. त्याचप्रमाणे तरुणांमधील व मुलामधील वाढता ताणतणाव हाही एक चिंतेचा विषय बनला आहे.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (निम्हान्स) च्या आकडेवारीनुसार देशातील १०.६ टक्के प्रौढ नागरिकांना मानसिक आरोग्यविषयक त्रास आहे. महिलांमध्ये ७.३ टक्के आणि पुरुषांमध्ये ५.८ टक्के लोकांना नैराश्य आणि चिंतेचे विकार जाणवतात. १५ ते २४ वयोगटातील युवकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण दरवर्षी सरासरी २३ टक्क्यांनी वाढत आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (एलसीआरबी २०२३) च्या आकडेवारीनुसार, भारतात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘मानसिक आरोग्य अहवालानुसार जगभरात २८ कोटी लोक नैराश्याने पीडित असून त्यापैकी १५ टक्के भारतातील आहेत. द लॅन्सेट सायकॅट्रीच्या २०२४ च्या अहवालानुसार, कोविड-१९ नंतर भारतात चिंता आणि वाढता ताण या मध्ये तब्बल ३५ टक्के वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याला शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्व देणे अत्यावश्यक ठरते.
मानसोपचार तज्ज्ञ्यांच्या मते भारतात मानसिक आरोग्याकडे अजूनही कलंकित दृष्टीने पाहिले जाते. हे शरीराच्या इतर आजारांइतकेच गंभीर असून योग्य वेळी उपचार घेतल्यास पूर्ण बरे होऊ शकते. विद्यार्थ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये ‘बर्नआउट’ सिंड्रोम, नैराश्य आणि चिंता वाढताना दिसतात. मानसिक आरोग्य हा राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा अविभाज्य भाग व्हायला हवा.
युजीसीच्या २०२४ च्या अहवालानुसार देशातील तीनपैकी एक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहे. आयआयटी, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आत्महत्येचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत ४२ टक्क्यांनी वाढले आहे. यासाठी अनेक विद्यापीठांमध्ये ‘कौन्सिलिंग सेल तसेच माइंडफुल कॅम्पास इनिशिएटिव्ह’ यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र हे प्रयत्न पुरेसे नसल्याचे दरवर्षी होणाऱ्या आत्महत्यांमधून स्पष्ट होते.
सरकारच्या बाजूने मानसिक आरोग्य क्षेत्रात काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत.यात ‘ नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम (टेली मानस)’ अंतर्गत चोवीस तास सल्ला सेवा सुरू करण्यात आली असून, १४४१६ या हेल्पलाईन क्रमांकावर दररोज हजारो नागरिक सल्ला घेत आहेत. याशिवा जिल्हा मानसित आरोग्य कार्यक्रम व आयुश्मान भारत आरोग्य आणि वेलनेस सेंटर अंतर्गत मानसिक आजारांचे निदान आणि उपचार मोफत उपलब्ध आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या योजनांमुळे गेल्या दोन वर्षांत जवळपास दोन कोटी नागरिकांना मानसोपचार सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला “मन:संपदा प्रकल्प” राज्यातील मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. २०२४ मध्ये या प्रकल्पांतर्गत ३२ जिल्ह्यांत आरोग्य शिबिरे घेण्यात आली, सुमारे पाच लाख विद्यार्थी आणि दोन लाख महिला यांना समुपदेशन देण्यात आले. “आपलं मन ऐका” या मोहिमेअंतर्गत २०० पेक्षा अधिक मानसोपचार तज्ज्ञ ग्रामीण व शहरी भागात पोहोचले. तरीही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आजही चिंतेचा विषय आहे.
आयसीएमआर च्या २०२४ च्या अभ्यासानुसार, महिलांमध्ये प्रसूतिपश्चात नैराश्याचे प्रमाण ग्रामीण भागात १८ टक्के तर शहरी भागात ११ टक्के आहे. पुरुषांमध्ये अल्कोहोल व्यसनाधीनता गेल्या पाच वर्षांत १७ टक्क्यांनी वाढली आहे. मानसिक आजारांमुळे भारताच्या एकूण जीडीपीच्या १.३ टक्के इतका आर्थिक तोटा होत असल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे.जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या २०२४ संयुक्त अहवालानुसार, दररोज चार तासांपेक्षा जास्त सोशल मीडिया वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये चिंता व काहीतरी चुकण्याची भीतीची लक्षणे २.५ पट अधिक आढळतात. त्यामुळे तज्ज्ञ ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि ऑफलाइन संवाद वाढवण्याचा सल्ला देत आहेत.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तज्ज्ञांच्या मते दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगाभ्यास करणे, दिवसातून एक वेळ डिजिटल ब्रेक घेणे, स्वतःच्या भावना लिहून ठेवणे, गरज वाटल्यास समुपदेशकाचा सल्ला घेणे आणि निसर्गाशी संवाद साधणे हे उपाय सर्वाधिक प्रभावी ठरतात. या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे, “मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे.” भारतात वाढता मानसिक ताण, बदलते सामाजिक वातावरण आणि कामाच्या स्पर्धात्मक स्वरूपामुळे “मन शांत, समाज सशक्त” हीच खरी गरज बनली आहे. मानसिक आरोग्याबाबत खुलेपणे बोलणे, लाज न बाळगता सल्ला घेणे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधणे हेच खऱ्या अर्थाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे संदेश आहे.