मुंबई : मद्याच्या नेशेत वरळी येथे आपल्या आलिशान बीएमडब्ल्यू गाडीने दुचाकीला धडक दिल्याचा आणि एका महिलेच्या मृत्युला जबाबदार असल्याच्या आरोपांतर्गत गेल्या सव्वावर्षापासून कोठडीत असलेल्या मिहीर शहा याने जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्यानंतर मिहीर याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मिहीर अटक झाल्यापासून ४०० दिवसांहून अधिक काळ खटल्याशिवाय तुरुंगात आहे, ही बाब सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारताना लक्षात घ्यायला हवी होती. परंतु, ती घेतली गेली नाही, असा दावा मिहीर याने जामिनाची मागणी करताना केला आहे. न्यायालयाने प्रकरणाच्या तथ्यांनुसार निर्णय देणे आवश्यक असल्याचेही मिहीर याने याचिकेत म्हटले आहे.
तसेच, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून मिहीरविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले गेले आहे. असे असतानाही त्याच्यावर अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, मिहीरचा न्यायालयीन कोठडीतील ४०० दिवसांचा काळ जामीन फेटाळताना सत्र न्यायालयाने विचारात घ्यायला हवा होता, असा दावा देखील याचिकेत करण्यात आला आहे. मिहीरला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याचप्रमाणे, तो मुंबईचा कायमस्वरूपी रहिवासी असून फरारी होण्याची, पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाही, असा दावाही मिहीर याने जामीन देण्याची मागणी करताना केला आहे.
मिहीर हा शिवसेना (शिंदे) नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. गेल्यावर्षी ७ जुलै २०२४ रोजी, मिहीर याने त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या प्रदीप नाखवा (५०) आणि त्यांची पत्नी कावेरी (४५) यांना धडक दिली होती. कावेरी गाडीचा बंपर आणि टायरमध्ये अडकल्याचे लक्षात येऊनही मिहीर याने त्यांना सुमारे दोन किमी अंतरापर्यंत फरफटत नेले होते. त्यामुळे, त्यांचा मृत्यू झाला होता. मिहीर याची ही कृती असंवेदनशील होती. त्यामुळे, त्याला जामीन देता येणार नाही, असे नमूद करून सत्र न्यायालयाने त्याची जामिनाची मागणी फेटाळली होती.