आपल्या बचावासाठी चालत्या रिक्षातून उडी घेणारी आणि अपघातानंतर तब्बल २० दिवसांनी कोमातून बाहेर पडलेली ठाणे येथील स्वप्नाली लाड (२४) ही युवती बुधवारी आपल्या घरी परतली. स्वप्नालीची प्रकृती हळुहळू सुधारत असून गणेशोत्सवाच्या काळात स्वप्नाली घरी परतल्याने लाड़ कुटुंबियांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.
घरी जाणाऱ्या मार्गाऐवजी चालकाने दुसऱ्या मार्गाने रिक्षा नेल्यामुळे भेदरलेल्या स्वप्नालीने बचावासाठी चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडली होती. रिक्षातून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेली स्वप्नाली तब्बल २० दिवस कोमात होती.
या घटनेप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्राच्या आधारे काही संशयितांची चौकशी सुरू असून त्यामध्ये रिक्षाचालकांचाही समावेश आहे. संशयितांचा शोध घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

रिक्षातून उडी घेतल्यानंतर कोमात गेलेली युवती शुध्दीवर