मुंबई- गोरेगाव येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने राहत्या इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अनंत द्विवेदी असे या तरुणाचे नाव आहे. तो जर्मनीत अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. नुकताच तो मुंबईत आला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अंधेरी राहणार्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा अनंत द्विवेदी (२२) हा जर्मनीत शिक्षण घेत होता. सध्या तो अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्गात शिकत होता. नुकताच तो मुंबईत आला होता. मंगळवारी सकाळी तो रिक्षाने ओबेरॉय ई स्क्वेर इमारतीजवळ आला. सुटे पैसे नसल्याने त्याने रिक्षा चालकाला प्रवेशद्वाराजवळ थांबवले आणि ५ मिनिटात सुटे पैसे घेऊन येतो असे सांगितले. मात्र बराच वेळ झाला तरी तो आला नाही. काही वेळातच त्याने इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळावरून त्याचा गुगल पिक्सल हा स्मार्ट फोन पोलिसांना मिळाला होता. मात्र आत्महत्येपूर्वी त्याने कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती.

सोमवारी रात्री तो साडेनऊच्या विमानाने जर्मनीला जाणार होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला विमानतळावर निरोप दिला होता. त्यानंतर त्याने कुटुंबियांना फोन करून विमानात बसल्याचेही सांगितले होते. मात्र तो विमानात न जाता रिक्षाने मंगळवारी सकाळी गोरेगावला आला होता, असे पोलिसांनी सांगितले. द्विवेदी कुटुंबियांची या इमारतीत एक सदनिका आहे. ते या इमारतीत अधून मधून राहण्यासाठी येतात. त्यामुळे तो या इमारतीत आला होता. त्याने आत्महत्या का केली त्याचा आम्ही शोध घेत आहोत. या प्रकरणी सध्या अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.