गोंदिया : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रात असलेल्या माडगी येथील नृसिंह मंदिरात १५ भाविक अडकले आहेत. यामध्ये  ७ स्त्रिया व ८ पुरुषांचा समावेश आहे. सर्व भाविक आंधळगाव, मोहाडी, तुमसर, मुंढरी, आदी गावातील रहिवासी आहेत. वैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे सर्वांना वरच्या माळ्यावर राहण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सर्व भाविक सुरक्षित असून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

मंदिरात अडकलेल्यांमध्ये मंदिर कमिटीचे अध्यक्ष नीलकंठ पुडके, मंजूषा पुडके, पुजारी निंबार्ते, प्रशांत पटले, मोहित गायधने, रेखा हेडाऊ, रेखा निमजे, पूनम मेश्राम, सुलोचना डेकाटे, कांता सोनवाने, उमेश मेश्राम, दामोधर नंदनवार, रामेश्वर कावळे, लीलाधर ढेकळे यांचा समावेश आहे. त्यांची सुटका करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. भंडारा येथून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक मंदिराकडे निघाले आहे.