गडचिरोली : विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच नातेसंबंधातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा गावाजवळील वळणावर मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अक्षय दसरथ पेंदाम (२३), अजित रघू सडमेक (२३), अमोल अशोक अर्का (२०) सर्व राहणार गोविंदगाव अशी मृत तरुणांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अक्षय, अजित आणि अमोल नुकत्याच घेतलेल्या नव्या दुचाकीवरून भरधाव वेगाने गडचिरोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, मुरखळा गावाजवळच्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी धडकली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचे दोन तुकडे झाले. मृत तरुण अहेरी तालुक्यातील गोविंदगावचे रहिवासी होते. तसेच एकाच नातेसंबंधातील असल्याचे कळते.

हेही वाचा – नागपूर-तुळजापूर महामार्गावर ट्रकचालकांचा चक्काजाम; यवतमाळ शहरातील वाहतूक खोळंबली

हेही वाचा – विदर्भात हजारो ट्रक पुन्हा थांबले! ‘हिट ॲण्ड रन’विरोधात संप

घरातील तरुण मुलांच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. यातील एकाचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. अपघाताची माहिती मिळताच रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A speeding bike hit truck the incident took place at a turn near murkhala village ssp 89 ssb