यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात गळ्यात ताराचा फास अडकलेला वाघ फिरत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही पर्यटकांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. या प्रकारानंतर अभयारण्यात शिकारी सक्रिय असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या मोठी असल्याने येथे व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची कायम गर्दी असे. वाघांची, बछड्यांची भ्रमंती येथे पर्यटकांना हखास बघायला मिळते. दरम्यान अभयारण्यातील कक्ष क्रमांक १११ मध्ये सफारीसाठी आलेल्या एका पर्यटकास गळ्यात ताराचा फास अडकेलेला वाघ निदर्शनास आला. शिकारीसाठी लावलेल्या ताराचा हा फास असल्याचे दिसून आले. अभयारण्यात रानडुक्कर, रोही, सांबर, चितळ, नीलगाय, ससे, मोर यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासात वाघ अडकला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पर्यटकाने ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली व ताराचा फास अडकलेल्या वाघाचे छायाचित्रच अधिकाऱ्यांना दाखविले. काही दिवसांपूर्वी एका वाघिणीसोबतही असा प्रकार घडला होता.

हेही वाचा >>>कल्याण गोळीबार प्रकरण : “भाजपचा नेता असो की कोणीही, दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे,” बावनकुळे यांचे मत

टिपेश्वर अभयारण्यातील वाघ अनेकदा क्षेत्राबाहेर जातात. एखाद्या शेतात लावलेला फास या वाघाच्या गळ्यात अडकला असण्याची शक्यता वनअधिकाऱ्यांनी उपस्थित केली. या वाघाला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याची परवानगी वरिष्ठांनी दिली असून वाघाच्या गळ्यातील फास काढण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. अभयारण्यात प्लास्टिक कचरा टाकण्यास सक्त मनाई असाना पर्यटक निष्काळजीपणे प्लास्टिक कचरा, तसेच पाणी बॉटल अभयारण्यात फेकतात. गेल्यावर्षी टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ रिकाम्या पाणी बॉटलसोबत खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता वाघाच्या गळ्यात हा फास गळ्यात अडकल्याचे पुढे आले आहे. या प्रकारामुळे टिपेश्वर अभयारण्यात वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निमार्ण झाले आहे.

वणी वन परिक्षेत्रांर्गत सुकेनगाव जंगलात दोन दिवसांपूर्वी वाघांची दोन बछडी मृतावस्थेत आढळली होती. या बछड्यांचा भुकेने व्याकूळ होवून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हे बछडे मृतावस्थेत आढळलेल्या परिसरात असलेल्या तलावाच्या वरच्या भागात वाघिणीचे आणि एका बछड्याच्या पायाचे ठसे आढळून आले.  या परिसरात वाघिणीला शोधण्यासाठी वन विभागाचा ताफा तळ ठोकून आहे. ही वाघिण नेमकी कुठे गेली याचा शोध घेण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tiger with a wire noose around its neck in tipeshwar sanctuary yavatmal nrp 78 amy