वाहतुकरांच्या संपामुळे होऊ शकणारा  इंधनाचा तुटवडा लक्षात घेता जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आले आहे.  जिल्ह्यातील शेकडो पेट्रोल पंपावरील इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वीणा बसय्ये यांनी ‘लोकसत्ता’ सोबत बोलताना ही महत्वपूर्ण माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकदारांचा संप व त्याच्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य सेवा, अन्नधान्य वाहतूक आदी अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोप पंपात राखीव इंधन साठा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> वाहन चालक संपावर, दुपारी दोनपर्यंत तोडगा निघणार? प्रशासनाचे ‘वेट अँड वॉच’

यासंदर्भात जिल्ह्यातील १३ तहसीलदाराना आवश्यक त्या सूचना,निर्देश देण्यात आल्याचे ‘डीएसओ’ वीणा बसय्ये यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या १११ पेट्रोल पंपातील ठराविक साठा राखीव ठेवण्यात येणार आहे. 

संपाचा अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

१११ पम्प फुल्ल

जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची संख्या १११ आहे. संपाची माहिती मिळताच जिल्ह्यातील लाखो  लहान, मध्यम  वाहनधारकांनी सोमवारी( दि.१) रात्रीच पंपासमोर रांगा लावल्या.मध्यरात्री पर्यंत या रांगा कायम राहिल्या. आज मंगळवारी सकाळी देखील हेच चित्र होते. बहुतेक वाहन धारकांनी ‘टँक फुल्ल’ करण्यावर भर दिल्याने एरवी सहा दिवस चालणारा इंधन साठा दोन तीन दिवसातच संपणार असे मजेदार चित्र आहे. संप कायम राहिला तर मात्र हेच चित्र गंभीर होणार हे उघड आहे.