अकोला : अवकाशात नवरात्रात नवा थरार अनुभवण्याची संधी उपलब्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे सलग चार दिवस दर्शन होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाश प्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली. या अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले. यंदा पावसाळा भरपूर लांबला आता पावसाने विश्रांती घेतली. आतापर्यंत ढगांच्या गर्दीत लपलेले आकाश देखील स्वच्छ झाले.
रात्री आकाशातील नवनव्या घडामोडींचा आनंद सण-उत्सवाच्या काळात नवे रंग भरत आहेत. १ ते ४ ऑक्टोबर सलग चार दिवस रात्रीच्या प्रारंभी फिरत्या चांदणीच्या स्वरूपात जगातील सर्वात महाग व महाकाय आकाराचे आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानकाचे दर्शन नुसत्या डोळ्यांनी होईल. हे स्थानक दरताशी सुमारे २८ हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीपासून सुमारे चारशे कि.मी.अंतरावरुन जाते. दीड तासात एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करते. आपल्या भागातून हे स्थानक जाते, त्यावेळी ते बघण्याची संधी उपलब्ध होईल, असे प्रभाकर दोड म्हणाले.
बुधवारी रात्री ७.३८ ते ७.४० यादरम्यान आकाशात उत्तर दिशेच्या जरा पश्चिम भागातील सप्तर्षीच्या शेपटीच्या बाजूने कालेय तारका समूहाकडे जाताना अवकाश स्थानक पाहता येईल. गुरुवारी सायंकाळी ६.५० ते ६.५५ या वेळी उत्तर दिशेला ध्रुवा जवळून पुढे सरकत राजा वृषपर्वा व राजकन्या शर्मिष्ठा यांच्या मधून ईशान्य दिशेस असलेल्या देवयानी आकाशगंगेच्या वरून पूर्व आकाशात दिसणाऱ्या शनी ग्रहाचे जवळ स्थानक विलुप्त होईल. शुक्रवारी रात्री ७.३९ ते ७.४४ या वेळात पश्चिमेस स्वाती नक्षत्रा जवळून भूजंगधारीतून वृश्चिक व धनु राशीकडे अवकाश स्थानक जाणार आहे. शनिवारी सायंकाळी ६.५१ ते ६.५७ यादरम्यान ठळक स्वरूपात वायव्य ते दक्षिणेस जाताना अवकाश स्थानकाचे दर्शन होईल. या आकाश मार्गावर स्वाती नक्षत्र, भूजंगधारी तारका समूह व वृश्चिक व धनु राशीकडे जाईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
पाच ग्रहांचेही दर्शन
सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी पाच ग्रह आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. सद्यस्थितीत सायंकाळी पश्चिमेस बुध व मंगळ, तर याच वेळी पूर्व आकाशात शनी ग्रह असेल. गुरु आणि शूक्र ग्रह पहाटे पूर्व आकाशात बघता येतील, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली. अवकाशातील घडामोडींचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.