अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ‘रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन’ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांतर्गत एक अनोखे तंत्रज्ञान विकसित केले. छतावरील सौर पॅनल स्वच्छ करणे नेहमीच अडचणीचे ठरते.त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हा ड्रोन केवळ ३० मिनिटांत एक मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पावरील धूळ साफ करून स्वच्छ करतो. सौर प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी हे नवतंत्रज्ञान उपयुक्त ठरेल.

डॉ. पंदेकृविच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ६०० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे. केंद्र शासन व ऊर्जा विभागाच्या प्रोत्साहनामुळे आता घरोघरी सौर प्रकल्प लावले आहेत. पॅनलवर जास्त प्रमाणात धूळ साचल्यास त्याची कार्यक्षमता कमी होऊन ऊर्जा निर्मिती घटते. त्यामुळे सौर पॅनल स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. पॅनल इमारतीच्या छतावर असल्याने त्याची साफसफाई करणे जिकरीचे कठीण जाते. यावर उपाय म्हणून ‘पीडिकेव्ही आरआयएफ’चे संचालक डॉ. एस.आर. काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट’चे व्यवस्थापकीय संचालक आशीष हांडे यांच्या नेतृत्वात ड्रोन विकसित केले. दुरदृष्टीतून सौर ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे हे तंत्रज्ञान साकारले आहे.

परंपरागत पद्धतीने सौर पॅनल स्वच्छ करताना वेळ, मनुष्यबळ आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. नव्या ड्रोनच्या मदतीने ही प्रक्रिया संपूर्ण स्वयंचलित, अत्यंत कार्यक्षम व पर्यावरणपूरक झाली. वेळ व संसाधनांची मोठी बचत होते. त्यासोबतच सौर पॅनलच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होते. सौर प्रकल्पांच्या देखभालीत ड्रोनचा वापर या क्षेत्रात क्रांती घडवेल, असे मत आशीष हांडे यांनी व्यक्त केले. भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाला स्वदेशी व शाश्वत तंत्रज्ञानाच्या मदतीने बळकटी देणे हे उद्दिष्ट आहे. ही कल्पना मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि हरित तंत्रज्ञानाचा प्रसार आदी राष्ट्रीय मोहिमांना चालना देते, असे डॉ. काळबांडे म्हणाले. ड्रोन तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरासाठी सज्ज असून देशभरातील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये याला मोठी मागणी होण्याचा अंदाज आहे.

ड्रोन तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात जागतिक दर्जाचे नवतंत्रज्ञान विकसित केले. ड्रोनद्वारे सोलर पॅनल स्वच्छ करण्याची चाचणी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यशस्वी झाली. यावेळी विभाग प्रमुख डॉ. सुचिता गुप्ता, डॉ. एम. एम. देशमुख, डॉ. प्रमोद बकाने, डॉ. अनिल कांबळे, धीरज कराळे, डॉ. मृदुलता देशमुख आदी उपस्थित होते.