चंद्रपूर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, गोंडपिपरी तालुक्यात चक्क रुग्णवाहिकेत डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने गर्भवती महिलेला एक तास पेट्रोल पंपावर ताटकळत राहावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. या आरोग्य केंद्रात तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी असून त्यापैकी एक अधिकारी कधीच मुख्यालयी राहत नाही. ते चंद्रपूरवरून ये-जा करतात. अशातच मंगळवारी धाबा येथील गर्भवती मोनिका रामदास तांगडपलेवार यांना त्रास जाणवायला लागला. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवायचे होते. धाबा आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका त्यांना घेवून चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, डिझेल नसल्यामुळे चालकाने रुग्णवाहिका गोंडपिपरी येथील पेट्रोल पंपावर नेली. डिझेल भरण्यासाठी चालकाकडे पैसेच नव्हते. पंपचालकाने उधारीवर डिझेल देण्यास नकार दिला. पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी तब्बल एक तास लागला. यादरम्यान गर्भवती महिला रुग्णवाहिकेतच होती. तासभरानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश चकोले यांनी पैशाची व्यवस्था केली आणि रुग्णवाहिका चंद्रपूरसाठी रवाना झाली.

हेही वाचा – वर्धा : अतिप्रखर सूर्यप्रकाशाने जनावरांमध्ये ‘तडक्या’चा प्रादुर्भाव; पशुपालक चिंतेत

जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असतानाही आरोग्य विभागाने गर्भवतीचा जीव धोक्यात टाकला. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता, कनिष्ठ लिपिकपद रिक्त असल्याने व पंचायत समिती स्तरावर देयके रखडल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. आता कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As there was no money for diesel the ambulance with the pregnant woman stayed at the petrol pump for an hour rsj 74 ssb