नागपूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही, अशा खालच्या पातळीवरचे कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या तोंडाला शाई लावण्यात आली. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. हा सरकार प्रायोजित हल्ला होता. आपल्यला जीवे मारण्याचा कट होता, असा आरोप खुद्द गायकवाड यांनी काल केला होता. मराठा समाजाकडूनही याचा निषेध करण्यात आला. यावर आज बावनकुळे यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, आमचा संबंध नाही, हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे . शिवसेना (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेना माहित राहायला पाहिजे, ते कार्यकर्ते हे सगळे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात, पोलिसांनी योग्य कारवाई करायला पाहिजे.

अधिवेशन अंतिम आठवडा –

विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकार देत आहे, प्रश्न सभागृहात मांडले त्याचे उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे, आणि याही आठवड्यामध्ये जे काही प्रश्न मांडले त्याचाही आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ, या महाराष्ट्राच्या सभागृह काम करणारा विरोधकांनी विधायक काम करावं आम्ही त्याच्या स्वागत करून त्यांनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ, असे बावनकुळे म्हणाले.