अमरावती : महावितरणकडून वेळोवेळी वीजबिल थकबाकी वसुली मोहीम वेगाने राबवली जाते. वीजबिल वसुलीवेळी थकबाकीदार ग्राहक आणि महावितरणचे कर्मचारी यांच्यात सातत्याने वादविवादाच्या घटना घडतात. यातून थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत थकबाकीदार ग्राहकांची मजल जाते. वीज चोरी प्रकरणी कारवाईच्या वेळीही हल्ले होतात. यापुर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास हल्लेखोरास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे. अशा घटनांत महावितरणने थेट फौजदारी कारवाई केली आहे.

वीज चोरीप्रकरणी कारवाई करत असलेल्या महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे. अमरावती येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नुकतीच पॅराडाईज कॉलनी येथील ग्राहक शेख हारून शेख यांच्या वीज मीटरची तपासणी महावितरणच्या भरारी पथकाने केली असता मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचे आढळले. कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित नसलेल्या मोहम्मद ईर्शाद या घरमालकाकडून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी उपकार्यकारी अभियंता भरीरी पथक सुरेंद्र बागडे आणि सहकारी कर्मचारी विशाखा राजूरकर, अमोल राठोड यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करत धक्का देऊन घराबाहेर काढले व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गाडगे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याआधी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. एस.टी. कॉलनी जम -जम नगर येथील अब्दूल शरीफ अब्दूल सत्तार या ग्राहकाच्या घरात मीटर बायपास करून वीज चोरी करण्यात आली होती. त्यावेळी तपासणीस गेलेल्या भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र बागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वीज ग्राहक आणि मुलगा अब्दूल साजिद अब्दूल शरीफ यांनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली व धमकी दिली. याप्रकरणी देखील गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज चोरी हा गंभीर गुन्हा असून कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर कठोर कारवाई केली जात आहे. अशावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना अडवणे, धमकावणे वा हल्ला करणे सहन केले जाणार नाही. भरारी पथकाची कामगिरी सुरळीत पार पडावी यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, अन्यथा कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा अटळ आहे, असा इशारा महावितरणने दिला आहे.