अमरावती : धारणी ते अकोट रस्त्यावर असलेल्‍या बारू गावातील तलाव आज सकाळी फुटला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आणि शेकडो हेक्टरवरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, या धक्कादायक घटनेने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

मेळघाटमध्ये जून महिन्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. त्यावेळी पुरेसा पाऊस न आल्याने पिकांची उगवणक्षमता कमी झाली होती. काही प्रमाणात पिकांनी तग धरला आणि पिके शेतात उभी होती. दरम्सान आज सोमवारी सकाळी अचानक शेतात पाणी शिरले आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कापूस, तूर, सोयाबीन, मका अशी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे झाले आहे.

सध्या मेळघाटच्या डोंगराळ भागातील शेतकरी खूप आर्थिक संकटातून जात आहेत. पैशाची कमतरतेमुळे शेतकरी रोजगाराच्या शोधात स्थलांतर करीत आहेत. बारू गावातील शेतकऱ्यांनी सांगितले की, या तलावाची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नव्हती. तलावाच्या मुख्य भिंतीला आधीच गळती लागली होती. कालांतराने ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या तलावाची दुरुस्ती करण्याचे आवाहन केले होते, परंतु शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मेळघाटातील सर्व तलाव जीर्ण झाले आहेत आणि या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. जवळजवळ सर्व तलावांची दुरुस्ती सुरू आहे. यावर्षी काही तलावांमधून गाळ काढण्यात आला आहे.

बोरू गावातील तलावाच्या भिंतीला आधीच भेगा पडल्या होत्या. पाण्याचा दाब वाढताच तलाव फुटला आणि पुराचे पाणी रस्त्यावर आले. रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने बारू गावाजवळ धारणी अकोट रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे अकोट मार्गावरील वाहतूक थांबवावी लागली. जोरदार प्रवाहामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे.

धारणी तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या ६६.५ टक्के तर चिखलदरा तालुक्यात ६९.० टक्के पाऊस झाला आहे. धारणी तालुक्यात ५८४.५ मिमी तर चिखलदरा तालुक्यात ७९७.५ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत धारणी तालुक्यात १६ मिमी तर चिखलदरा तालुक्यात १८.५ मिमी पाऊस झाला. मेळघाटात पावसाचे प्रमाण यंदा कमी असले, तरी काही भागात अतिपाऊस आणि काही भागात कमतरता अशी स्थिती आहे. बारू या गावातील तलाव फुटल्याने शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट निर्माण झाले आहे. शासनाने त्वरित नुकसान भरपाईची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.