नागपूर : एखाद्या विषयाच्या जनजागृतीसाठी देश-विदेशात विविध प्राणी, मानवी अवयवांशी संबंधित विशेष दिवस साजरे होतात. परंतु देहदान दिवस साजरा होत नाही. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असल्याने जगभरात नागरिकांना देहदान करण्यासाठी आवाहन केले जाते. तेव्हा या दिवसाला विशेष महत्त्व न दिल्यास देहदान वाढणार कसे? हा प्रश्न देहराष्ट्रार्पण संस्थेने उपस्थित केला आहे.

ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदासह इतर सगळ्याच वैद्यकीयशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराशी संबंधित माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी या सगळ्यांना देहदानातून प्राप्त देहाजवळ नेवून विशेष वर्ग घेतले जातात. या विद्यार्थ्यांना या देहावर विविध प्रयोगही करावे लागतात. त्यातून आपल्याकडे चांगले वैद्यकीय डॉक्टर घडतात. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देहदानातून प्राप्त देहाची गरज असते.

हेही वाचा >>> ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! खासगी बस उलटली, २० प्रवासी जखमी

देश-विदेशात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालय वाढत आहे. या वाढीव महाविद्यालयाच्या तुलनेत सर्वत्र देहदान वाढणे अपेक्षित असताना त्या प्रमाणात देहदान अद्यापही होत नाही. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांत या देहांचा तुटवडा जाणवतो. अद्यापही नागरिकांना प्रोत्साहन देता येईल असा देहदान दिवस मात्र साजरा केला जात नाही. काही संस्था त्यांच्या स्तरावर जनजागृतीसाठी देहदानाचे कार्यक्रम करतात. परंतु, जागतिक स्तरावर देहदान दिवस साजरा करून नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहनही देहराष्ट्रार्पण संस्थेचे संचालक रमेश सातपुते यांनी केले.

हेही वाचा >>> नागपूर : महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून, एका नराधमाचा मृतदेहावरही अत्याचार

विशेष दिवसाचे फायदे

देश-विदेशात आंतरराष्ट्रीय नेत्रदान दिवस, रक्तदान दिवस, मूत्रपिंड दिवस, ह्रदय दिवस, आरोग्य दिवस, मेंदू दिवसासह इतरही विविध विशेष दिवस साजरे केले जातात. या दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र विविध संस्था, शासन स्तरावर शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा, प्रदर्शन, नाटक, चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून एखाद्या विषयाकडे नागरिकांचे लक्ष वेधले जाते. निश्चितच त्यामुळे सर्वत्र अवयव दान, रक्तदानासह इतरही गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. देहदान दिवसातून या पद्धतीचे उपक्रम झाल्यास हे दाणही वाढणे शक्य आहे.

पूर्वी प्राण्यांच्या देहावरच व्हायचे प्रयोग

वैद्यकीयच्या विविध शाखांमधील शिक्षणासाठी सुरुवातीला इंग्लंडसह इतर देशात मृत प्राण्यांचे शरीर वापरले जात होते. परंतु, अभ्यासात प्राण्यांचे व मानवाच्या शरीरातील अवयवांत फरक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर देहदानातून मिळणाऱ्या देहावर अभ्यास सुरू झाले. आता मानवी देहच वापरले जातात, अशी माहिती सातपुते यांनी दिली.

बेवारस, अपघातग्रस्त, खुनाचे मृतदेह वापरणे कठीण

सर्वसामान्यांमध्ये बेवारस, अपघातग्रस्त, खून व आत्महत्याचे मृतदेह वैद्यकीय अभ्यासासाठी जास्त प्रमाणात वापरले जात असल्याचा चुकीचा समज आहे. प्रत्यक्षात या सर्व मृतदेहांचे कायद्याने शवविच्छेदन करावे लागते. त्यामुळे त्या शरीराची हानी होऊन ते लवकर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे हे मृतदेह कामात येत नाहीत. मानवाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यावर या देहाचे ६ ते आठ तासातच देहदान संबंधित संस्थेला होणे आवश्यक असल्याचेही सातपुते म्हणाले.