नागपूर : “ते” पट्टीचे शिकारी आहेत. एकदा का सावज त्यांच्या तावडीत सापडले, तर त्याचे लचके तोडल्याशिवाय ते थांबत नाहीत. त्याला पुर्णपणे संपवूनच ते थांबतात. बोर व्याघ्रप्रकल्पात असाच एक शिकारीचा थरार रंगला. पर्यटक मार्गदर्शक शुभम पाटील याने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय रानकुत्रा ज्याला ढोल या नावानेही ओळखले जाते. रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसतो. हे कळपात राहतात व शिकार करतात, फक्त या कुत्र्यांचे वैशिष्ठ्य असे की यांचा कळपांची प्रमुख राणी असते. हे रानकुत्रे असले तरी दिसायला अत्यंत गोड दिसतात. त्यांना जंगलात फिरताना, बागडताना बघतो, तेव्हा आपल्याला पुसटशीही कल्पना येत नाही की, हे कुत्रे किती भयानक शिकारी आहेत. अनेकदा हे रानकुत्रे एखादा मोठा गवा किंवा एखादे सांबर हेरतात आणि मग त्याच्या मागे लागतात.

सावज शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी पळत असताना मागून हे रानकुत्रे त्या सावजाचे लचके तोडायला सुरुवात करतात. अनेकदा हे रानकुत्रे शिकारीसाठी एकत्र येतात आणि येताना इतर रानकुत्र्यांना वेगळ्या प्रकारची ‘शीळ’ घालून खुणावत असतात. त्यामुळे या रानकुत्र्यांना ‘शीळवाले शिकारी’ म्हणूनही ओळखले जाते. हे रानकुत्रे एवढे कट्टर असतात की, शिकारीच्या आड वाघ किंवा बिबट्या जरी आला, तरी ते त्यालाही जुमानत नाहीत. त्याच्यावरही चहूबाजूंनी आणि वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून हल्ला चढवून त्यालाही पळवून लावतात.

जंगलात एक वेळ वाघ, बिबट्या हे अनुभवायला मिळू शकतात, परंतु रानकुत्रे म्हणजेच ढोल पाहायला मिळणे, अनुभवायला मिळणे हे तसे कठीणच. सावज दिसले की रानकुत्र्यांच्या कसरती वाढू लागतात. जणू काही ते वॉर्मअप करतात. बरेचदा ते अशा उड्या मारून समोरच्या भक्ष्याला घाबरवूनही सोडत असतात. तसाच काहीसा प्रकार बोर व्याघ्रप्रकल्पात सुरू होता. काही वेळ गेला आणि या रानकुत्र्यांच्या कळपाच्या इथून एक वेगळ्याच प्रकारची ‘शीळ’ घातल्यासारखा आवाज यायला सुरुवात झाली. काही वेळाने पूर्ण कळप एकत्र आला. समोरच्या मोकळ्या गवताळ कुरणात बऱ्याच लांबवर काही हरणे आणि काही सांबरांचे कळप चरताना दिसत होते. काही वेळाने रानकुत्र्यांचा हा कळप जसा शिट्या घालत एकत्र आला, तसाच चार-दोनच्या टोळ्यांमध्ये विखुरलाही. येथून खऱ्या अर्थाने खऱ्या ‘शिकार नाट्याला’ सुरुवात झाली. समोरच्या गवताळ कुरणामध्ये चरणारी हरणे आणि सांबरे सावध झाली.

परंतु रानकुत्रे एवढे चतुर की, ते झाडांच्या मागे लपत मध्येच गवतातून वाट काढत आपल्या सावजापर्यंत पोहोचत होते. ते रानकुत्रे अगदी त्या सांबरांच्या कळपाजवळ जाऊन पोहोचले. सांबर ‘पोक पोक’ करून अलार्म देत होते. पण रानकुत्र्यांनी त्या सांबरांच्या कळपातले एक सांबर हेरले होते. अचानक शीळ घालत रानकुत्र्यांनी सांबरांच्या कळपावर हल्ला चढवला. हरणांच्या आणि सांबरांच्या कळपाची धावाधाव सुरू झाली. सर्व सांबरे बिथरली. काही क्षणांतच त्या रानकुत्र्यांनी त्या पूर्ण कळपाला बिथरवून त्यातले हेरलेले सावज पकडले. त्याचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच त्यांनी त्या सांबराच्या पाठच्या पायाचे लचके तोडायला सुरुवात केली. पुढे पुढे ते सांबर आणि मागे जवळपास आठ ते दहा कुत्रे, असा एकेरी सामना सुरू झाला होता. काही वेळातच ते सांबर अर्धेअधिक संपलेसुद्धा. ते दृश्य एवढे भयानक आणि हृदयद्रावक होते की, सांबर जिवाच्या आकांताने ओरडत होते आणि पाठीमागून रानकुत्रे त्याचे लचके तोडत होते. त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या, तरीही शरीरात जीव शिल्लक असल्यामुळे ते जीव वाचवण्याची शेवटची कसरत करत होते.

अखेरीस त्या कुत्र्यांनी सांबराला लोळवले. पुढच्या काही मिनिटांतच तिथे सर्व रानकुत्रे एकत्र जमा झाले. राहिलेले सांबरही त्यांनी फस्त केले. तिथे फक्त रक्ताचा आणि हाडांचा सडा पडला होता. ‘शीळवाल्या कुत्र्यांनी’ आपली शिकार फस्तही करून टाकली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bor tiger reserve wild dogs hunt sambar video goes viral rgc 76 css