बुलढाणा : कृषिप्रधान व पाळीव प्राण्यांची लक्षणीय संख्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी लम्पि आजाराने धुमाकूळ घातला होता. यामुळे रिक्त पदांचे व असुविधाचे ग्रहण लागलेल्या पशु संवर्धन विभागाच्या मर्यादा उघडं पडल्या होत्या. मुक्या जनावरांचा कर्दनकाळ ठरलेल्या या लम्पिने जिल्ह्यात पुन्हा प्रवेश केला आहे.

खान्देश विभागाला लागून असलेल्या व विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुक्यातील दोघा पाळीव जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला असून एका गायी वर मलकापूर येथे उपचार सुरु आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी लंम्पि सदृश्य लक्षणे असलेली काही जनावरे आढळून आल्याचे वृत्त आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो पशुधन मालक भयभीत झाले असतानाच पशु संवर्धन विभाग अलर्ट मोड वर आल्याचे चित्र आहे. प्राथमिक स्तरावर शेतकरी व पशुधन मालक यांच्यात जन जागृती करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच लम्पि चा सामना करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

कृषी विज्ञान केंद्र म्हणते…

दरम्यान स्थानिय कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत असलेल्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुपालकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणामार्फत जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

‘लम्पी स्किन डिसीज’ हा एक विषाणूजन्य चर्मरोग असून, तो ‘कॅप्रीपॉक्स व्हायरस’मुळे होतो. रोगाचा प्रसार माश्या, डास, गोचीड, चिलटे यांच्या माध्यमातून, बाधित व निरोगी जनावरांच्या संपर्कातून होतो. नाक-डोळ्यातील स्त्राव, तोंडातील लाळ चाऱ्यावर व पाण्यावर लागल्यास संसर्ग होतो. रोगाचा सर्व वयोगटातील जनावरांवर परिणाम होत असला तरी लहान वासरे अधिक प्रभावित होतात. उष्ण आणि दमट हवामानात कीटकांची वाढ अधिक असल्याने पावसाळ्यात प्रादुर्भाव वाढतो.

ताप, दुध उत्पादनात घट, डोळ्यातून पाणी , लसिका ग्रंथीना सूज, त्वचेवर गाठी, डोके, मान, पायावर, फुप्फुसदाह, कासदाह, गर्भपात व प्रजनन क्षमतेत घट, पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होणे ही रोगाची लक्षणे आहे. बाधित व निरोगी जनावरांना वेगळे ठेवावे, एकत्रित चारा-पाणी देऊ नये, गोठ्यात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण, लसीकरण , गोठ्याची स्वच्छता , माशा व डास यांचे नियंत्रण करणे अत्यावश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले

अहवाल अप्राप्त

यासंदर्भात पशु संवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मलकापूर तालुक्यात लागण झाली आहे. दोघा जनावरांना लागण झाली व एकाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहे. या बाधित जनावरांचे नमुने तपासणी व परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावरच जनावरांना लंपी ची लागण झाली का व मृत्यू झाला का? हे सांगता येईल. आजाराचा सामना करण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.