चंद्रपूर: आरक्षण हा ‘गरिबी हटाव’चा कार्यक्रम नाही किंवा खिरापत वाटण्याचाही कार्यक्रम नाही. उपेक्षित आणि दुर्लक्षित समाजाला बरोबरीने आणण्यासाठी आक्षण आहे. मात्र अलिकडे आरक्षणाच्या बाबतीत ‘लो भाई जिलेबी, लो भाई जिलेबी’ असं चाललंय. कुणी दबाव टाकला की घेऊन जा जिलेबी अशा पध्दतीने आरक्षण प्रमाणपत्र वाटत सुटले आहेत, अशी टिका माजी विरोधी पक्ष नेते तथा ओबीसी समाजाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.
काँग्रेस आमदार वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना माध्यमांशी संवाद साधतांना आरक्षणावरून महायुती सरकारला धारेवर धरले. आरक्षण सामाजिक, शैक्षणिक या मागासलेपणावर मिळतो. उपेक्षित आणि दुर्लक्षित माणसाला बरोबरीने उभं करण्यासाठी आरक्षण असते. कुणालाही वाटून द्यायला आरक्षण म्हणजे खिरापत नाही, अलीकडे मात्र लो भाई जिलेबी, लो भाई जिलेबी असं चाललंय.दबाब टाकला की घेऊन जा जिलेबी.असे आरक्षण, प्रमाणपत्र वाटप सुटले आहेत.ज्यावेळी मागास असलेला समाज बरोबरीने उभा होईल त्यावेळी आर्थिक निकष लागू करायला हरकत नाही.
बहुजन समाज आज सुद्धा सर्व क्षेत्रात मागास आहे. राज्य सरकारने निवडणुकीत जाहीर केलेली कर्जमाफी आता दिली पाहिजे. लाडक्या बहिणींचे कारण पुढे करून पैसे नसल्याचा बहाणा न करता कर्जमाफी देण्याची आता गरज आहे. शेतकऱ्यांच्या हातून खरीप पीक अतिवृष्टीने निघून गेले आहे. सरकारने दिवाळीपूर्वी कर्जमाफी दिल्यास त्याला रब्बी पिक तरी घेता येईल असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील शेतकरी प्रचंड दु:खात आहे. त्याला मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. राज्य सरकारने साडेतेराशे कोटीची मदत जाहीर केली आहे. पालकमंत्री प्रा.अशोक उईके यांनी बांधावर जावून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
मात्र साडेतेराशे कोटीमधून चंद्रपूर जिल्ह्याला एक नवी फुटी कौडी मिळणार नाही अशी टीका करित माजी विरोधी पक्ष नेते तथा कॉग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्री प्रा.अशोक उईके यांना फाईलावर घेतले.