चंद्रपूर : वन अकादमीतील एका बंद खोलीत स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स आहेत. ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमधील आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात उधळी लागल्यामुळे त्याची नासाडी झाली आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखोंची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे. हा धक्कादायक प्रकार आम आदमी पक्षाने समोर आणला असून कारवाईची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन अकादमी येथे एका बंद खोलीत लाखोंचे साहित्य पडून असल्याची माहिती आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांना मिळाली. त्यांनी या माहितीच्या आधारावर तिथे भेट दिली असता लाखोंची उपकरणे व आरोग्य विषयक साहित्य पडून होते. यामध्ये स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स पडून होते. दरम्यान राईकवार या खोलीत गेले असता मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनी तिथे जाण्यापासून अटकाव केला. त्यामुळे आपचे जिल्हाध्यक्ष राईकवार आणि रेड्डी यांच्यात शाब्दीक वाद झाला. राईकवार यांनी तात्काळ या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली. मात्र रेड्डी यांनी उडवा उडवीची उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान वाद एवढा वाढला की, रेड्डी यांनी पोलिसांना पाचारण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस आल्यावरही आपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेत घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण चौकशीची मागणी केली. यावेळी निवेदन देताना वन अकादमीतील शासकीय निवासस्थानी निष्काळजीपणे टाकून दिलेली लाखोंची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधी किट्स आणि इतर साहित्य यांची तात्काळ चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur materials worth lakhs found lying in a locked room at forest academy rsj 74 ssb