चंद्रपूर: येथील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सात सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर पुजाऱ्याला एका खोलीत बांधून ठेवले आणि मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड टाकून दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास घडली. या सशस्त्र दरोड्यामुळे शहरात आता मंदिर देखील सुरक्षित राहिलेले नाही, असे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाताळा मार्गावरील ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया हे मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तथा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आहे. अतिशय देखण्या व पावन अशा या मंदिरात डिसेंबर महिन्यात नुकताच ब्रम्होत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शन व पूजाअर्चा करण्यासाठी येतात. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. संपूर्ण परिसर बघितला. तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली. त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरे बंद केले. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्याला बंदुकीने धाक दाखवून दोन्ही हात बांधून एका खोलीत बांधून ठेवले. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले. यावेळी सातही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.

हेही वाचा : कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?

रात्री दोन वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याने घटनेची माहिती इतरांना दिली. बंधक बनवून ठेवलेल्या पुजाऱ्याची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव त्यांची संपूर्ण टीम घेऊन मंदिरात दाखल झाले. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहरात मागील काही दिवसांत चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गुरुद्वारा तुकुम भागात तर दोन चोर ॲक्टिवा या दुचाकी वाहनाने रात्री फिरायचे व घरात कुणी दिसले नाही की प्रवेश करून चोरी करायचे. याची तक्रार परिसरातील नागरिकांनीं पोलीस ठाण्यात केली. मात्र पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले नाही. पोलीस दखल घेत नाही हे बघून शेवटी नागरिकांनीच सापळा रचून चोराला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur tirupati balaji temple theft pujari threatened with gun rsj 74 css