राम भाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : शेतीला जोडधंदा मिळाल्याशिवाय आर्थिक संपन्नता येत नाही ही बाब लक्षात घेऊन ‘ग्रामायण’ या संस्थेने विदर्भातील ग्रामीण भागांत शेण, गोमूत्रापासून विविध वस्तूनिर्मितीचे प्रशिक्षण देऊन रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून दिले आहे.

‘ग्रामायण’ ही संस्था या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत उमरेड भागातील १० आणि जिल्ह्यातील अन्य १७ गावांत हा उपक्रम राबवला जातो. यातून शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे. शेती हा तोट्यातील व्यवसाय, अशी स्थिती सार्वत्रिक आहे. जोडधंदा असल्याशिवाय शेती परवडत नाही, मात्र हा जोडधंदा कोणता, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. या पार्श्वभूमीवर ‘ग्रामायण’ने शेण आणि गोमूत्रापासून वस्तूनिर्मितीचा पर्याय ग्रामीण महिलांना दिला. या प्रकल्पाचे प्रमुख विजय घुगे म्हणाले, २०१५-१६ मध्ये ‘ग्रामायण’च्या माध्यमातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. २०२० मध्ये उमरेडमध्ये ग्रामविकास कौशल्य विकास प्रकल्प सुरू केला. त्याद्वारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला, आदिवासी महिलांना देशी गोवंशाचे संवर्धन कसे करावे, याबाबत प्रशिक्षण दिले.

अनेक गावांत गावरान गायी जास्त दूध देत नाहीत. गायीचे गोमूत्र आणि शेण उपयोगी पडते. एक गाय दिवसभरात सहा किलो शेण देते. ते गोळा केले जाते. त्यापासून खतनिर्मिती केली जाते. गांडूळ खत तयार केले जाते. त्याला बाजारात चांगली किंमत मिळते. गोवऱ्या, धूपबत्ती आणि तत्सम वस्तू तयार केल्या जातात, त्यालाही चांगली मागणी आहे. त्याचप्रमाणे गोमूत्रापासून गोमूत्र आसव, पंचगव्य, दंतमंजन, केशतेल, शाम्पू, फेस पावडर, साबण अशी सुमारे ४५ ते ४७ उत्पादने तयार केली जातात.‘ग्रामायण’तर्फे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न केला जातो. त्याचेही प्रशिक्षण दिले जाते. सध्या अनेक मॉल्समध्ये या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यांना दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातून महिलांना रोजगार मिळतो. एका महिलेला पाच हजारापासून १६ ते १७ हजार रुपये महिना उत्पन्न होते.

‘ग्रामायण’मधून प्रशिक्षण घेणाऱ्या महिला याबाबत इतर गावांतही जागृती करतात. त्याचा लाभ शेकडो ग्रामीण कुटुंबीयांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी झाला आहे. या उपक्रमाला काही सेवाभावी संस्था, व्यक्तींकडून मिळालेल्या देणगीतून संस्था प्रशिक्षणासाठी लागणारी साधने खरेदी करते. त्यातून विकास आणि विस्तारांची कामे होतात, असे घुगे यांनी सांगितले.

महिलांना रोजगार उपल्बध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा ‘ग्रामायण’चा उद्देश आहे. त्याबरोबरच देशी गोवंशाचे आणि पर्यावरण संवर्धनही होते. – विजय घुगे, प्रकल्प प्रमुख, ग्रामायण

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changbhala fertilizer various products are made from cow dung in nagpur asj