विद्यार्थ्यांना शिक्षणाची संकल्पना समजावून त्यात गोडी निर्माण करण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने राज्यात ‘मोबाईल डिजीटल’ हा उपक्रम सुरू केला. राज्यातील अकरा जिल्ह्य़ांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के राबविण्यात आला असला तरी खुद्द मुख्यमंत्र्यांचा जिल्हा हा उपक्रम शंभर टक्के राबविण्यात यशस्वी होऊ शकला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिक्षण आयुक्त पुरुपोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने राज्यात सर्वत्र ‘मोबाईल डिजीटल’ हा उपक्रम राबविण्यात सुरुवात झाली. या नव्या उपक्रमाचा प्रारंभ हा गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यापासून करण्यात आला. भामरागड तालुक्यातील सर्व शाळा मोबाईल फ्रेंडली झाल्या आहेत. हे यश बघता राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाईलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा निर्धार शिक्षण विभागाने केला. या उपक्रमात शिक्षकांजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या मदतीने व शिक्षणासंबंधी विविध अॅप्स डाऊनलोड करून मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, वर्गात त्यांची उपस्थिती वाढावी आणि या निमित्ताने त्यांना डिजीटल संकल्पनेचा परिचय व्हावा, अशा उद्देशाने या उपक्रमाला राज्यात प्रारंभ झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील अहमदनगर, नंदूरबार, पालघर, नांदेड, बुलढाणा, परभणी व िहगोली या जिल्ह्य़ांमध्ये विभागाने हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी केला. तेथील बहुतांश शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. त्या तुलनेत मात्र विदर्भातील फक्त गोंदिया, गडचिरोली व भंडारा अशा तीन जिल्ह्य़ांतील शाळा उपक्रमाच्या माध्यमातून शंभर टक्के यशस्वी झाल्यात. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांचा जिल्हा व राज्याच्या उपराजधानीत हा उपक्रम अध्याप शंभर टक्के यशस्वी झाला नाही. इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत आजही मुख्यमंत्र्यांचा जिल्हा उपक्रम राबविण्यात मागे आहे.
एकीकडे नुकतेच डिजीटल महाराष्ट्राचा शुभारंभ मुंबईत झाला. पंतप्रधानांनी डिजीटल संकल्पना अंमलात आणण्याचे आवाहन केले. असे असताना नागपूर जिल्हा हा उपक्रम राबविण्यात अग्रक्रमांकावर असणे अपेक्षित होते. शिवाय संगणकाचा वापर करीत शाळा डिजीटल करण्याबाबत सूचना राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. अनेक शाळांत डिजीटल क्लास रूमदेखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याजोडीने आता स्मार्टफोनचाही वापर शाळांमध्ये करण्यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला. शिक्षकांजवळील असलेल्या स्मार्टफोन मध्ये ई- बालभारती सारख्या अनेक विविध पुस्तके डाऊनलोड करून मोबाईलच्या स्क्रीनसमोर मोठय़ा िभगाच्या माध्यामातून डिजीटल शिक्षण देण्यास सुरुवात झाली. आज नागपूर जिल्ह्य़ात जवळपास एक हजार ५८१ शाळा आहेत. खासगी शाळा पकडून त्या ४ हजार ३४ होतात. मात्र इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत आज देखील मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्य़ात मोबाईल डिजीटल उपक्रम शंभर टक्के यशस्वी होण्यास शिक्षण विभागाला यश आलेले नाही.

आजही काही शिक्षकांजवळ स्मार्टफोन नाही आहेत. त्यामुळे हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी करण्यास आम्हाला अडचणी येत आहेत. मात्र, नवे सत्र सुरू होण्यापूर्वी नागपूर जिल्हा शंभर टक्के मोबाईल डिजीटल झालेला असेल. जिल्ह्य़ातील शिक्षकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिक्षकांनी स्वखर्चातून स्मार्टफोन विकेत घेतले आहेत. थोडय़ा प्रमाणात उरलेल्या शाळा जून महिन्याच्या पूर्वी मोबाईल डिजीटल होतील.
– दीपेंद्र लोखंडे, शिक्षण अधिकारी, प्राथमिक विभाग, नागपूर