नागपूर : निवडणूकीचे वातावरण सध्या चांगलेच तापायला लागले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. शहर कोणतेही असो, निवडणूकीचा माहोल मात्र सर्वत्रच आहे. आजी-माजी आमदार, मंत्री असे सारेच त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचाराला लागले आहेत. अर्थात आचारसंहितेची मर्यादाही आहेच. निवडणूकीला ज्वर चढत असतानाच आता राज्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘सीएम’च्या ‘रोड शो’ने साऱ्यांचीच झोप उडवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहे आणि त्याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. आतापर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले होते. आता बफरक्षेत्रातसुद्धा पर्यटकांची तेवढीच गर्दी वाढू लागली आहे. ताडोबातील वाघ पर्यटकांना कधी निराश करत नाहीत आणि म्हणूनच वारंवार पर्यटक ताडोबात येतात. ‘सीएम’तर इथले राजा आहेत. त्यामुळे ताडोबात त्यांचा प्रवेश झाला रे झाला की पर्यटकांचा ताफाही त्यांच्यामागे दिसलाच म्हणून समजा. छायाचित्रकारांचे कॅमेरे देखील यावेळी सज्ज होतात. वेगवेगळ्या अँगलने छायाचित्र कसे घेता येईल, याचीच जणू होड पर्यटकांमध्ये लागलेली असते. अशावेळी ‘सीएम’ देखील पर्यटकांना निराश करत नाही. ‘सीएम’च्या करारीपणाचे, त्यांच्या धैर्याचे अनेक किस्से पर्यटन वाहनचालक, पर्यटक मार्गदर्शक, पर्यटक यांच्याकडून येथे सांगितले जातात. त्यांच्या करारीपणाच्या, धैर्याच्या कथा ऐकूनच नवे पर्यटक केवळ त्यांच्या दर्शनासाठी ताडोबात येतात.

ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…

हेही वाचा >>>रामटेकात आक्रीतच घडलं; जागा शिवसेनेची, बंडखोर काँग्रेसचा अन् सोबतीला विद्यमान खासदार व माजी मंत्री

अर्थातच हे ‘सीएम’ म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अनभिषिक्त सम्राट ‘छोटा मटका’. काही महिन्यांपूर्वी ‘बजरंग’ आणि ‘सीएम’ उर्फ ‘छोटा मटका’ यांच्यात जोरदार झुंज झाली. थरकाप उडवणाऱ्या या झुंजीचे अनेक पर्यटक साक्षीदार होते. या झुंजीत ‘सीएम’ उर्फ ‘छोटा मटका’ने बजरंगला थेट यमसदनी धाडले. मात्र, त्याचवेळी तो देखील गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर बरेच दिवस पर्यटकांना तो दिसलाच नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातीलच ‘मोठा मटका’ या वाघाचा हा लहान मुलगा. या ‘सीएम’ उर्फ ‘छोटा मटका’ने ताडोबाच्या बफर क्षेत्रात आपले साम्राज्य उभारले. बरजंगलसेाबतच्या झुंजीत तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला शोधण्यासाठी वनखात्याची १४ जणांची चमू जंगलात गेली. त्यानंतर तो नवेगाव परिसरात लावण्यात आलेल्या ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये आढळला. तब्बल दोन महिने तो कुणालाही दिसून आला नाही. दोन महिन्याने तो दिसला, पण त्याच्या चालीतला तो दरारा बराच कमी झाला होता. आता मात्र निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘सीएम’ उर्फ ‘छोटा मटका’चा ‘रोड शो’ चांगलाच चर्चेत आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chota matka a tiger from the tadoba andhari tiger project gave a glimpse to the tourists rgc 76 amy