नागपूर : पंतप्रधान घरकूल योजनेतून बांधण्यात आलेल्या वाठोडा भागातील निवासी वसाहतीमधील नागरिक पाणी मिळत नसल्याने घर सोडून इतरत्र जात आहेत. या वसाहतीत इतर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाठोड्यात पंतप्रधान घरकूल योजनेतून गरिबांसाठी एनएमआरडीने ६०० निवासी गाळे बांधले होते. एप्रिल २०२१ मध्ये लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. या वसाहतीला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी (दिवसाला आठ लाख लिटर) महापालिकेकडे आहे. यासाठी एनएमआरडीए महापालिकेला दर महिन्याला पैसे देते. मात्र सध्या तेथील परिस्थिती बघितली तर पाण्यासाठी नागरिक घर सोडत आहेत.

हेही वाचा >>> भाजपकडून इच्छुकांच्या आशेवर पाणी!, निवडणूक प्रमुख केल्याने उमेदवारीचा दावा संपुष्टात?

जवळपास सहाशे कुटुंब या ठिकाणी राहत असून त्यांच्यासाठी रात्री उशिरा एक तास पाणी सोडले जाते. ते पुरेसे नाही त्यामुळे नागरिकांना इतर ठिकाणांहून पाण्याची तजवीज करावी लागते. पाण्याच्या त्रासाला कंटाळून वसाहतीतील अनेक कुटुंब घर सोडून गेले आहेत. काहींनी नातेवाईकांच्या घरी मुक्काम हलवला आहे. तेही घर सोडण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे शासन स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिल्याचा दावा करते. पण दुसरीकडे तेथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना या घरात राहणे अवघड झाले आहे. पाण्यासोबतच रस्त्यांचीही अवस्था दयनीय आहे. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांना नोटीस; सव्वातीन कोटींच्या अनियमिततेचे प्रकरण

टँकर मालकांकडून लूट

महापालिकेचे टँकर या भागात जात नाहीत. खाजगी टँकर मालक वारेमाप शुल्क आकारून नागरिकांची लूट करतात. एरवी तीनशे ते चारशे रुपयाला मिळणारे टँकर उन्हाळ्यात एक ते दीड हजार रुपयाला मिळत असल्याची तक्रार तेथील नागरिकांनी केली.

वर्गणी करून टँकर बोलावतो

गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यात पाण्याची समस्या आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नाही. एक किमी दूर तरोडी गावात जाऊन दुचाकीने, आटोरिक्षाने पाणी आणावे लागते. खाजगी टँकरसाठी १ ते २ हजार रुपये द्यावे लागतात. आम्ही वर्गणी करून ही रक्कम गोळा करतो. – राजेश भांडारकर, रहिवासी.

पाणी नसल्याने नातेवाईकांकडे मुक्काम

गेल्यावर्षीच या ठिकाणी राहायला आलो. उन्हाळ्यात पाण्याची समस्या असल्याने घर बंद करून नातेवाईकांकडे राहण्यासाठी जातो. वसाहतीतील अनेक जण घर सोडून दुसरीकडे राहण्यासाठी गेले आहेत. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा भेटलो, मात्र यावर कुठलाच तोडगा निघाला नाही. टँकर मिळत नाही. त्यामुळे आम्ही जगावे कसे असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे. – वित्तल आसरे, रहिवासी

…तर घरच घेतले नसते

पंतप्रधान घरकूल योजनेतून घर मिळाले मात्र, येथे सुविधांचा अभाव आहे. पाण्याची समस्या आहे. याची कल्पना असती तर येथे आलो नसतो. पाणी मिळत नसल्यामुळे नंदनवनमधून गाडीने पाणी आणतो. ते पाणी आम्ही दिवसभर पुरवतो. – माया देशमुख, रहिवासी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens left their homes due to lack of water vmb 67 ysh