गोंदिया : गोंदिया येथील  रेलटोली परिसरातील गजबजलेल्या   पाल चौक ते कुडवा नाका चौक जवळील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या मार्गावर आज शुक्रवार २० जून रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास एक नारंगी रंगाचा आणि एक काळया रंगाचा अशा दोन वळूंच्या झुंजीचा थरार उपस्थित नागरिकांनी अनुभवला.  आधीच नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाजवळील हा मार्ग अरुंद असून येथे नेहमी ये जा करणारे विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ असते.

सध्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासह इतरही शैक्षणिक कामासह येणाऱ्याची खूपच गर्दी होत आहे. अशातच शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता त्या सुमारास या मार्गावर दोन वळुंची झुंज रंगली. या वळुंची झुंज रंगताच लोक सैरावैरा पडू लागले. दरम्यान दुचाकी वर ये जा करणारे दुचाकीला जागेवरच स्थिर करून   सुरक्षित जागा शोधत पळू लागले.

पहिल्यांदा ५ मिनिट आणि दुसऱ्यांदा किमान १५ ते २० मिनिट या दोन वळुंनी आपले डोके एकमेकांना चिटकवून ठेवले , कधी एक वळू दुसऱ्यावर जड होताना दिसायचा तर कधी दोघेही एकमेकांना मागे ढकलायचे. १५ ते २० मिनिट त्यांची झुंज सुरू होती. उपस्थित काही लोकांनी यांना वेगवेगळे करण्याकरिता प्रयत्न चालविले.

दरम्यान आधी त्यांना काठीचा धाक दाखविला नंतर काठीने मारहाण केली व शेवटी अंगावर बादलीने पाणी ओतले. असेच काही प्रयत्न करून या दोघांना वेगवेगळे करीत एकाला जवळील पटेल साॅ मिल येथे पळवले तर दुसऱ्याला विरुद्ध दिशेने पळ काढण्यास भाग पाडले.

सुमारे ३० मिनिटे   चाललेल्या या दोन वळुंच्या  झुंजीच्या थरारामुळे वर्दळीच्या या  मार्गावरील दोन्ही कडील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्हीकडे सायकल,दुचाकी आणि शेकडो च्या संख्येने विद्यार्थी नागरिक आणि इतर  ही झुंज संपुष्टात येण्याची वाट बघत ताटकळत उभे होते.  या   वळुंना उपस्थित नागरिकांनी विरुद्ध दिशेने पाठविल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.