नागपूर : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सुटे पैसेबाबत झालेल्या वादातून बसच्या वाहकाला मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर घडली. एसटीच्या नव्या भाडेवाढीमुळे प्रवाशी व वाहक यांच्यात झालेल्या सुट्या पैशांवरून दररोज बाचाबाची होत असून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आगारातील नांदेड बुद्रुक या मार्गावर कामगिरी बजावणाऱ्या वाहकाला मारहाण झाल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाडेवाढ झाल्यानंतर पाच दिवसात अनेक ठिकाणी बाचाबाची झाल्याच्या घटना सोशल मीडियावर फिरत असून यातून पुढे काही अनर्थ घडू नये यासाठी खबरदारी म्हणून भाडेवाढ सूत्रात तात्काळ बदल होण्यासाठी एसटीकडून पुन्हा एकदा राज्य परिवहन प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

नवीन भाडेवाढ ही पाच रुपयांच्या पटीत असावी असा स्पष्ट प्रस्ताव एसटीने या पूर्वीच पाठवला असताना त्याला प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली व आर्थिक नुकसान होण्याचे कारण देत अनपेक्षितपणे बदल करून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्याचा आदेश काढला असून सध्या चलनात सुट्या पैशाचे व्यवहार जवळ जवळ बंद झाले आहेत.

ए.टी. एम. मधून सुद्धा शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटा निधत असल्याने कोणताही प्रवाशी सुटे पैसे मागितल्यावर देत नाही. तरीही भाडेवाढ करतांना प्राधिकरणाकडून एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केली गेली व एसटीला तोटा होण्याची भीती दाखऊन अनपेक्षितपणे प्राधिकरणाकडून हा निर्णय लादला गेला असल्याची टीकाही बरगे यांनी केली आहे. या घटनेनंतर एसटी प्रशासन या घटना टाळण्यासाठी काय उपाय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एसटी प्रशासनाने पुन्हा पत्र द्यावे

भाडेवाढीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहे. १६ जून २०१८ रोजी व २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी जी भाडेवाढ करण्यात आली आहे. ती पाचच्या पटीत करण्यात आली असून त्याच सूत्रानुसार भाडेवाढ पाचच्या पटीत करण्यासाठी प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना सांगायला हवे.सुट्या पैशाची अडचण येत असल्याचे पुरावे देऊन त्याच प्रमाणे वाहकांकडून आलेल्या तक्रारी व पोलिसात दाखल झालेले गुन्हे याचे पुरावे सादर करून पुन्हा एकदा प्रस्ताव एसटीकडून पाठवला जावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conductor beaten up during a dispute over change money while traveling in st bus mnb