मानकापूर पोलिसांची कारवाई

नागपूर : उच्चशिक्षित प्रेमीयुगुलाने झटपट पैसा कमावण्यासाठी शक्कल लढवून चोरीचा मार्ग पत्करला. बंगल्यात वास्तव्य करायचे आणि कार घेऊन चोरी करायची, अशी त्यांची पद्धत होती. या बंटी-बबलीला जेरबंद करण्यात मानकापूर पोलिसांना यश आले आहे. त्यांनी आतापर्यंत शहरातील विविध भागात चार ते पाच ठिकाणी घरफोडी केली असून पोलिसांनी त्यांच्याकडून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शैलेश वसंता डुंभरे (२९) रा. वराडकर लेआऊट, हजारी पहाड आणि प्रिया (२१) रा. सुरेंद्रनगर अशी आरोपींची नावे आहेत. प्रिया मूळची अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी येथील रहिवासी असून शिक्षणासाठी नागपुरात आली. शैलेश एमबीए पदवीधारक असून तो एका कॉस्मेटिक कंपनीत अधिकारी होता. अधिक पैसा कमावण्यासाठी त्याने नोकरी सोडून दिली. दोन वर्षांपूर्वी प्रियाची ओळख आरोपीशी झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले व सतत संपर्कात होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

दोघांनाही हॉटेलमध्ये जेवण करणे, पबमध्ये पार्टी करणे, मित्रांसोबत महागडय़ा कारमध्ये फिरण्याचा छंद होता. हे छंद पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. शेवटी दोघांनीही चोरी करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी गोरेवाडा परिसरात एक बंगला भाडय़ाने घेतला व तेथे लिव्ह इनमध्ये राहू लागले. एप्रिल-२०१९ पासून त्यांनी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार घरांमध्ये घरफोडी केली. याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर शेंडे, संतोष राठोड, राजेश वरठी, हितेश फरकुडे, सुनील विश्वकर्मा, नगमा, वैशाली, ज्योती, अनिल मिश्रा व अजमत शेख यांनी तपास करून आरोपींना पकडले. त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली असून त्यांच्याकडून कार, लॅपटॉप, विदेशी चलनाच्या नोटा, गॅस कटर, गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, मोबाईल असा एकूण ९ लाख ८७ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यू-टय़ूबवरून चोरीचे कौशल्य शिकले

आरोपी उच्चशिक्षित असून त्यांनी कमी कालावधीमध्ये अधिक पैसा कमावण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला. चोरी करण्याचे कौशल्य त्यांनी यू-टयूबवरून आत्मसात केले. चोरी करण्यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा स्वत:च प्रात्यक्षिक केले. कौशल्यात पारंगत झाल्यानंतर त्यांनी पहिली चोरी केली व तेव्हापासून त्यांचा आत्मविश्वास उंचावला. आपल्याला कुणी पकडू शकत नाही, असे त्यांना वाटत होते.

कारमुळे पकडले गेले

दुपारच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक केसरी रंगाची कार संशयास्पद फिरत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून केसरी रंगाच्या सर्व कारची माहिती घेतली. त्यापैकी एमएच-३१, एफई-२३६२ क्रमांकाच्या कारवर पोलिसांना शंका आली. तिचा शोध घेतला असता गोरेवाडा परिसरातील एका बंगल्यासमोर कार उभी दिसली. बंगल्यातील कारमालकावर चोरीचा संशय घेणे पोलिसांना योग्य वाटले नाही. त्यामुळे काही दिवस पोलिसांनी कार व त्या बंगल्यात राहणाऱ्यांवर पाळत ठेवली. एक दिवस दोघेजण कारमध्ये बसून रात्रीच्या अंधारात चोरी करण्याच्या उद्देशाने बाहेर पडले. पोलीस त्यांच्या मागावर होते. पोलिसांची खात्री पटल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला.