वर्धा : वर्ध्यात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याचे लपून नाही. वर्धा लगत नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात दारूची चोरटी वाहतूक होत असल्याचे दिसून येते. त्याला अटकाव घालण्यासाठी पोलीस दलाने बाहेरील जिल्ह्यातील परवाना धारक दारू विक्रेत्यावर जाळे टाकणे सूरू केले आहे. या प्रकरणात नागपूर जिल्ह्यातील व वर्धेलगत असणाऱ्या वडगाव येथील ग्रीन व्हिलेज बारचा मालक समीर जायस्वाल याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करीत त्यास आरोपी केले आहे.

समुद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री होत असल्याचे दिसून येत असल्याने पेट्रोलिंग सुरू झाली. शेडगाव चौरस्ता येथे राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचण्यात आला. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कारला (एक्सयूव्ही ५०० – एम एच ४९ बी ८४४६) अडवील्यावर कारचालकाची चौकशी करण्यात आली. त्याचा सोबती बाजूस बसून असलेला हा पोलिसांचा सापळा लक्षात येताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मात्र या गाडीत कोकण प्रीमियम, टॅंगो पंच, रॉयल स्टॅग, ओसी ब्लू असा देशी विदेशी दारूचा साठा आढळून आला. तो साडेपाच लाख रुपये किमतीचा आहे. तसेच गाडी, मोबाईल व दारुसाठा मिळून २१ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…

कारचालक हा दारुसाठा हिंगणघाट येथील आकाश उर्फ टिन्या गवळी याच्यासाठी घेऊन चालला होता. त्याच्याच सांगण्यावरून दारुविक्री व वाहतूक करीत असल्याचे कर चालकाने सांगितले. आरोपी अमरदीप जीवणे रा. संत कबीर वॉर्ड हिंगणघाट, तेजस मेश्राम, टिन्या गवळी व बारमालक जायस्वाल विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, उपनिरीक्षक उमाकांत राठोड तसेच मनोज धात्रक, अरविंद येनूरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोले यांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा – ST Bus : एसटीची चाके पुन्हा थांबणार? मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक रद्द झाल्याने कर्मचारी…

नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात झालेली ही पहिलीच धडक कारवाई होय. जिल्ह्यात दारूचा महापूर रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस खात्यावर राहिले आहे. स्थानिक पातळीवर गावठी दारूचे अड्डे छुप्या पद्धतीने सुरू असतात. त्यातच दारूबंदी नसलेल्या जिल्ह्यातून अवैध मार्गाने दारूचे पाट वाहत असतात.