नाशिक – दुपारी चार वाजेच्या पॅसेंजर गाडीने नाशिकमध्ये यायचे. आणि तीन ते चार तास पाहणी करुन रात्री घरफोडी करायची. सराईत गुन्हेगाराच्या नियोजनबध्द योजनेने पंचवटी पोलिसांसह सारेच चक्रावले. सीसीटीव्ही चित्रण तसेच मानवी कौशल्याने पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० घरफोड्या करणारा सराईत ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. संशयिताकडून ११ तोळे सोने, एक किलो ५२ ग्रॅम चांदी असा एकूण १३ लाख सहा हजार ७५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत असतांना घरफोडींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पंचवटीतील कल्पेश पार्क परिसरात घरफोडी झाल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल झाला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपआयुक्त संगिता निकम यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या.

पंचवटी पोलीस गुन्हे शोध पथकाने पंचवटीत झालेल्या घरफोडीच्या परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रण तपासले. सीसीटीव्ही चित्रण आणि कौशल्याचा वापर करत संशयिताला पकडण्यासाठी पंचवटी पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार शोध पथकाचे अधिकारी सतीश शिरसाठ आणि अन्य सहकाऱ्यांनी दोन पथके तयार करत घरफोड्या झालेल्या ठिकाणांची पाहणी केली.

एक पथक मखमलाबाद रोड, ड्रिम कॅसल, गणेशनगर परिसरात अजून एक पथक आणि दुसरे पथक औंदुबर नगर, अमृतधाम परिसर या भागात रात्री ११ ते पहाटे चार या वेळेत फिरु लागले. तीन ते चार दिवस सापळा लावला. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता हवालदार कैलास शिंदे आणि सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही चित्रणात दिसणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. फारूक रज्जाक काकर (४८, रा. पाचोरा) असे त्याने नाव सांगितले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे घरफोडीचे साहित्य, घरफोडीत लंपास केलेला मुद्देमाल सापडला. तो जप्त करण्यात आला. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारूक याच्यावर अंबड पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.

घरफोडी अशी होत असे

पंचवटी तसेच म्हसरूळ परिसरात घरफोडीचे वाढते प्रमाण पाहता काही ठिकाणी सामाजिक दायित्व निधीतून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. घरफोडीच्या घटनांचा तपास करतांना सीसीटीव्हीतील चित्रण उपयोगी येत आहे. या चित्रणामुळेच संशयित लक्षात आला. तो दुपारी चारच्या पॅसेंजरने नाशिकमध्ये येत असे. पंचवटी, म्हसरूळ परिसरात दोन ते तीन तास पाहणी करुन बंद घरे हेरत असे. रात्रीतून एकटा घरफोडी करायचा.