महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेण्याच्या मुद्यावरून बुधवारी विधान परिषदेत काँग्रेसचे अभिजित वंजारी व भाजपचे प्रसाद लाड यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. उपसभापतींनी दोन्ही सदस्यांना समज दिल्यावर हा वाद निवळला. राज्यातील उद्योग इतर राज्यात जाऊ नये यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या यासंदर्भात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी नियम ९३ अन्वये विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला होता. यावर बोलताना वंजारी यांनी गुजरात निवडणुकीचा व त्यात भाजपला मिळालेल्या यशाचा उल्लेख करताना निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील उद्योग तेथे स्थानांतरित केल्याचा भाजपला फायदा झाल्याचा आरोप केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेने तेथील ‘बॉलीवुडचे स्टुडियो’ बंद करण्यासाठी नोटीस बजावली, मुंबईतील ‘बॉलीवुड इंडस्ट्रीज’ गुजरातला पळवणार का? असा सवाल केला. यावर सत्ताधारी बाकावरील प्रसाद लाड यांनी आक्षेप नोंदवला. सभागृहात बोलण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार आहे, त्यांना थांबवण्याचे अधिकार फक्त पीठासीन अधिकाऱ्यांना आहे, असे सांगत वंजारी यांनी लाड यांचा आक्षेप फेटाळून लावला.

हेही वाचा: “शीशे मे रेहनेवाले घर मे…”; फडणवीसांनी हिंदीमिश्रीत मराठीत केलेल्या ‘त्या’ कमेंटने पिकला एकच हशा! CM शिंदेंनाही हसू अनावर

मात्र, लाड यांनी त्याला पुन्हा प्रतिउत्तर देणे सुरू केले. यावरून या दोन्ही सदस्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. शेवटी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला. बोलण्याची ही पद्धत नाही, तुम्ही मारामारी करणार का? असा सवाल करीत विषयाच्या चौकटीत मुद्ये मांडा, या शब्दात दोन्ही सदस्यांना समज दिली. त्यानंतर वाद निवळला. दरम्यान, वंजारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईची ‘बॉलीवूड इंडस्ट्रीज’ कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांसाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा दावा केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debate between prasad lad abhijit vanjari legislative council and dr neelam gorhe gave a stern explanation nagpur cwb 76 tmb 01