नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत.

६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यंदाही मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून धम्म लर्निंग केंद्र सारनाथ उत्तर प्रदेशचे भदन्त चन्दिमा थेरो, उत्तरप्रदेश येथील भंते विनाचार्य, डॉ. राज शेखर वृंड्र, स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मंगळवार ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत धम्मदीक्षा सोहळा होणार असून सुरई ससाई हे बौद्ध धम्माची दीक्षा देणार आहे. दीक्षाभूमीवर ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थित पार पडणार आहे. यंदाही मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले गेले नसले तरी सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उत्तरप्रदेश येथील भंते विनाचार्य यांना बोलावण्यात आले आहे.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आंदोलनाच्या नावावर त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा फटका ठेवत अशा लोकांना कार्यक्रमास लावण्यावरून आंबेडकरी समाजामधून प्रचंड विरोध होत आहे. यासाठी काही समाजबांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सदस्यांसमोर सोमवारी सायंकाळी आंदोलन केले. तसेच दीक्षाभूमी सोहळ्यात भंते विनाचार्य आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा यांना बोलावू नये, अशी मागणी करण्यात आली.

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाला विविध पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना बोलावले जात होते. मात्र, याला आंबेडकरी समाजातील नागरिकांचा वाढता विरोध पाहता २०२४ पासून दीक्षाभूमीच्या मुख्य सोहळ्याला राजकीय नेत्याला स्थान दिले गेले नाही. मात्र, यावेळी उत्तरप्रदेश येथील भंते विनाचार्य यांना निमंत्रण देण्यात आले आहे. महाबोधी विहाराच्या आंदोलनात त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.

त्यामुळे अशा व्यक्तींना दीक्षाभूमीवर बोलावू नये, यासाठी सोमवारी सायंकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मारक समितीच्या काही सदस्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची स्मारक समितीच्या सदस्यांसोबत बैठक झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.