नागपूर : मेट्रोने बांधलेल्या डबल डेकर उड्डाणपुलामुळे विमानतळ चौकातील वाहतुकीचे गणित बिघडले आहे. उड्डाणपुलावरून उतरलेल्या वाहनांची मोठी गर्दी विमानतळ चौकात होत असल्यामुळे नागपूरकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

अजनी चौकापासून सुरू होणाऱ्या व शहरातील सर्वात लांब असलेला हा उड्डाणपूल विमानतळ चौकाच्या काही अंतरापूर्वी उतरतो. सीताबर्डीकडून शहराबाहेर जाण्यास एकमेव सोपा मार्ग म्हणून या उड्डाणपुलाचा वापर करण्यात येतो. तसेच शहरात प्रवेश करण्यासाठीसुद्धा याच उड्डाणपुलाचा सर्वाधिक वापर करण्यात येतो. मात्र, याच उड्डाणपुलामुळे विमानतळ चौकात वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. उड्डाणपुलाखाली उतरणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे चौकात तासनतास वाहतूककोंडी होते. तसेच या चौकाच्या अगदी समोरच विमानतळ मेट्रो स्टेशन आहे. येथे प्रवाशांची बरीच गर्दी असते. उड्डाणपुलावरून येऊन ज्यांना यू-टर्न घ्यायचा असतो, त्यांना या कोंडीचा मोठा फटका बसतो. चौकात वाहतूक पोलिसांचे बूथ आहे. परंतु, बूथमध्ये पोलीस कर्मचारी पूर्णवेळ दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालक सिग्नल तोडून भरधाव वाहने पळवतात. यामुळे येथे नेहमीच अपघाताची भीती असते.

हेही वाचा – एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीत २०२५ पासून बदल; उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक

सिग्नलचे वेळापत्रक चुकले

विमानतळ परिसरात जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे. मात्र, चौकात वाहतूक सिग्नल आहे. उड्डाणपुलावरून चिंचभवनकडे जाणाऱ्या मार्गावरचा सिग्नल ९० सेकंदांचा आहे. तो कायम हिरवा ठेवल्यास वाहतूककोंडी सुटू शकते, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हॉटेल्समुळे आणखी अडचण

विमानतळामुळे या रस्त्यावर मोठ्या व लहान हॉटेल्सची संख्या जास्त आहे. रस्त्यावर हॉटेल्सचे फलक, जाहिरातीचे कठडे नेहमीच असतात. हॉटेलमधील ग्राहकांचीही वाहने रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

हेही वाचा – संजय राऊत यांच्या आरोपाने नागपूरचे भाजप नेते संतप्त; मला कोणाकडून रसद घेण्याची गरज नाही-विकास ठाकरे

उड्डाणपुलावरून खाली उतरताच विमानतळ चौकात मोठी गर्दी दिसते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होताना दिसत नाही. – सरला वाघमारे, विद्यार्थिनी.

वर्धेकडून नागपुरात येणाऱ्या वाहनांना थांबण्याची गरज नसल्याचे लक्षात येताच वाहतूक सिग्नलच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला. या चौकात तीन पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात असतात. – विनोद चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सोनेगाव वाहतूक शाखा.