|| मंगेश राऊत
गोरखधंद्याचा बुरखा फाटला, कठोर कारवाईची मागणी:- देहव्यापाऱ्याच्या व्यवसायात सापडलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करवून घेण्यासाठी स्वत:ला तिची आई सांगणाऱ्या महिलेची ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. परंतु मुलीचा व आईचा ‘डीएनए’ जुळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पुन्हा त्या मुलीला देहव्यापाऱ्याच्या दलदलीत ढकलण्यासाठी हा महिलेचा आटापिटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संबंधित बनावट आईवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राजू बाई असे बनावट आईचे नाव आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये वणी येथील देहव्यापार अड्डय़ाावर पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. त्यापैकी १६ वर्षांची एक मुलगी उपराजधानीतील महिला सुधारगृहात आहे. तिचा ताबा मिळण्यासाठी राजू बाईने आपण तिची आई असल्याचा दावा केला आहे. त्याकरिता तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. देहव्यापारात सापडलेल्या मुलींना सोडवण्यासाठी बनावट आईवडील उभे होत असल्याची माहिती फ्रिडम फर्म या स्वयंसेवी संस्थेला होती. त्यामुळे त्यांनी प्रकरणात मध्यस्थी करून संबंधित महिलेने पीडितेची आई होण्याचा पांघरलेला बुरखा फाडण्यासाठी प्रयत्न केले. संस्थेने सुटका करण्यात आलेली मुलगी आणि महिलेची डीएनए चाचणी करण्याची विनंती केली. न्यायालयाने दोघांचीही डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले. काही दिवसांपूर्वी या चाचणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. दोघींचेही डीएनएन वेगवेगळे असून स्वत:ला मुलीची आई सांगणारी महिला तिची आई नसल्याचे स्पष्ट झाले. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. हा अतिशय गंभीर प्रकार असून या महिलेला असेच सोडून देणे योग्य होणार नसून, यातून समाजाला धडा मिळावा याकरिता तिच्यावर कठोर दंडासह योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. या महिलेला किती दंड करावा व कोणती शिक्षा द्यावी, यासंदर्भात युक्तिवाद करण्यास फ्रिडम फर्मला सांगितले.
पालकांनी बालपणीच विकले
न्यायालयाने मुलीची साक्षही नोंदवून घेतली. यावेळी मुलीने ताबा मागणारी महिला आपली आई नसल्याचे सांगितले. आपल्या आईवडिलांनी आपण लहान असतानाच देहव्यापाराकरिता विकले होते. आता त्या क्षेत्रात परत जायचे नसल्याची भावना अल्पवयीन मुलीने व्यक्त केली असून सुधारगृहातच राहण्याची इच्छा व्यक्त केली.