‘सुपरस्पेशालिटी’त वृद्धाला जीवनदान

नागपूर : सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांचा दिवाळीचा बेत ठरला होता.. हातचे काम संपत आले होते..घरी कुटुंबीय प्रतीक्षेत होते.. यातल्या काही डॉक्टरांना आपल्या मूळ गावी जायचे होते.. त्यांचे वाहनही सज्ज होते.. इतक्यात रुग्णालयाचा दूरध्वनी खणखणला.. हृदविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मृत्यूशी झुंजत असलेला एक रुग्ण इकडे पाठवल्याचा निरोप मिळाला.. हा निरोप ऐकताच डॉक्टरांनी आपल्या कर्तव्याला स्मरुन दिवाळीचा बेत रद्द करून थेट  शस्त्रक्रियागृह गाठले.. चार तास अत्यंत  गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चालली.. अन् अखेर रुग्णाचा जीव वाचला.. अशा प्रकारे माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठतेची प्रचिती देत डॉक्टरांनी ही अनोखी दिवाळी साजरी केली.

जगदीश (बदललेले नाव) असे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झालेल्या वर्धा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल असताना त्यांना दिवाळीच्या एक दिवसआधी शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या हृदयाच्या मध्यभागातील पडदाच फाटला. डॉक्टरांनी तातडीने नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सुपरचे हृदय शल्यक्रिया विभाग प्रमुख डॉ. निकुंज पवार यांच्याशी संवाद साधण्यात आला. दरम्यान, रुग्णालयाची वेळ संपल्याने डॉक्टरांसह सगळे कर्मचारी दुसऱ्या दिवशी दिवाळी असल्याने विविध खासगी कार्यक्रमानुसार निघण्याच्या तयारीत होते.

डॉ. पवार यांनी त्वरित डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत रुग्णाबाबत सूचित केले. सगळ्यांनीच माणुसकीच्या नात्याने खासगी, दिवाळीच्या कार्यक्रमाला बाजूला सारून शस्त्रक्रियेसाठी पूर्ण मदत करण्याचा निर्धार केला. काहींनी दिवाळीनिमित्त बाहेरगावी कुटुंबासह जाण्याचा कार्यक्रमही दुसऱ्या दिवसावर ढकलला. दरम्यान, विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशीही संपर्क साधला गेला. हा रुग्ण शासकीय योजनेत  बसत नसल्याने व त्याला खासगी रुग्णालयातील खर्च झेपणे शक्य नसल्याने त्याकडून नंतर पैसे घेण्याचे ठरले. रुग्णासाठी शस्त्रक्रियागृह सायंकाळी पाच वाजता उघडून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू झाली. ती रात्री ९ वाजेपर्यंत चालली.

हृदयाच्या मधल्या पडद्याला सूक्ष्म पद्धतीने शिवण्यात आले. त्यातून रक्तस्राव होत नसल्याची खात्री करत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत रात्री उशिरापर्यंत ठेवले गेले. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यावर शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची मदत बघून रुग्णाच्या नातेवाईकांचेही डोळे पाणावले. सगळ्यांनी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

शस्त्रक्रियेनंतरही मृत्यूचे प्रमाण ५० टक्के

वैद्यकशास्त्रानुसार, या वृद्धाला असलेल्या आजारात तातडीने शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्येही वाचण्याचे प्रमाण हे ३० ते ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे हृदय शल्यचिकित्सकांचे निरीक्षण आहे. ही शस्त्रक्रिया सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयात यशस्वी झाल्याने येथील डॉक्टरांचा दर्जा खासगी रुग्णालयासारखाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

अत्यवस्थ रुग्णाची माहिती कळताच घरी निघालेल्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी विनाविलंब सेवा देण्यास होकार दिला. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी रुग्णाचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिले. शस्त्रक्रियेमुळे आता रुग्ण स्थिर आहे.’’

– प्रा. डॉ. निकुंज पवार, विभाग प्रमुख, हृदयशल्यक्रिया विभाग.