महेश बोकडे, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर :  भ्रष्टाचार संपवण्यासाठी परिवहन खात्याने १४ जून २०२१ पासून घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाने देणे सुरू केले. त्यासाठी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत मोठा घोळ होत असल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने उघड केला होता. आता परिवहन आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना केंद्राला (एनआयसी) ही परीक्षा पारदर्शी पद्धतीने ‘इन कॅमेरा’ कशी होईल, याबाबत सूचना केली आहे.

परिवहन खात्याने घरबसल्या वाहन चालवण्याचा परवाना देण्यासाठी ‘एनआयसी’कडून वाहन व सारथी ४ या संगणकीय प्रणालीत बदल करून घेतले होते. त्यानंतर मोठय़ा संख्येने नागरिक या सुविधेचा लाभ घेत घरबसल्या परवाने घेत आहेत. या सुविधेने आरटीओतील भ्रष्टाचार नियंत्रणात येणार असल्याचा दावा होत असतानाच ‘लोकसत्ता’ने नागपूर कार्यालयात एक ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. त्यात घरबसल्या एका उमेदवाराची परीक्षा दुसरीच व्यक्ती देऊन परवाना घेत असल्याचे उघड केले. या वेळी एका अंध व्यक्तीने वाहन चालवण्याचा परवाना घेतल्याचेही स्पष्ट झाले.

या प्रकरणाची परिवहन आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली. त्यानुसार या योजनेला पारदर्शी करण्यावर काम सुरू केले आहे. त्यानुसार ‘एनआयसी’ला पत्र लिहून ही परीक्षा घरबसल्या कॅमेऱ्याची नजर ठेऊन कशी घेता येईल, त्यावर काम सुरू केले आहे. त्यानुसार ही परीक्षा देताना उमेदवाराने काहीही आक्षेपार्ह हालचाली केल्यास तो स्वयंचलित पद्धतीने परीक्षेतून बाद होईल.

तसेच आधार कार्डवरील छायाचित्राच्या आधारे ‘इन कॅमेरा’ उमेदवाराची पडताळणीही होईल. त्यामुळे चुकीची व्यक्ती ही परीक्षा देणे बंद होण्यास मदत मिळणार आहे.

परिवहन खात्याकडून घरबसल्या ऑनलाइन परीक्षा पारदर्शी पद्धतीने ‘इन कॅमेरा’ व्हाव्या म्हणून ‘एनआयसी’ला सूचना दिली गेली आहे. त्यानुसार सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात आहे. लवकरच त्यावर काम होण्याची आशा असून असे झाल्यास अशा पद्धतीने देशात महाराष्ट्र ‘इन कॅमेरा’ परीक्षा देणारे पहिले राज्य असेल.

 – डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driving learning licence test will conducted in front of cctv camera zws