जागतिक तापमानवाढीचा परिणाम केवळ निसर्ग आणि मानव जातीवरच होत नसून तो आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यावरसुद्धा होत आहे. अंतर्गत हालचालींमुळे भूगर्भातील हालचाली वाढतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे दोन्ही ध्रुव थरथरत आहे, ह् आता वास्तव आहे. याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, ते भविष्यातच कळणार आहे.
तब्बल १८९९ पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या ध्रुवाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. आजपर्यंत हे थरथरणे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचाच एक भाग असल्याचे वाटत होते.
मात्र, नासाच्या ‘जेट प्रपोल्शन लेबॉरटरी’चे वैज्ञानिक सुरेंद्र अग्निहोत्री आणि एरिक एविन्स यांनी पृथ्वीच्या थरथरण्याचे कारण हे जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या ध्रुवीय बर्फ वितळण्यामुळे आणि त्यातून वजनाच्या अस्ताव्यस्त प्रमाणामुळे आहे, असे संशोधनाअंती सिद्ध केले आहे. उपग्रहाच्या माध्यमातून समुद्रातील पाण्याच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला.
‘सायन्स अ‍ॅडव्हान्स’ या मासिकात काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा निष्कर्ष प्रकाशित केला आहे. १८९९ पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या अक्षाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. विसाव्या शतकात ते थोडेसे कॅनडाकडे झुकल्याचे आढळले, पण २००२ नंतर ते इंग्लंडकडे झुकल्याचे आढळले असून अक्षाची गती दरवर्षी ७ इंचाने पूर्वेकडे वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे धृवावरील बर्फ वितळले. विशेषत: २००३ पासून ग्रीनलंडवरील २७३ ट्रिलियन किलो, तर पश्चिम अंटाक्र्टिकावरील १२४ ट्रिलियन किलो बर्फ वितळले. मात्र, पूर्व अंटाक्र्टिकेवर ७४ ट्रिलियन किलो बर्फ दरवर्षी जास्त गोळा होत गेले, तसेच यामुळे सागरी प्रवाहात आणि पातळीतही बदल होत आहे. याच असमतोलामुळे पृथ्वीचे ध्रुव थरथरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखेर सत्य उलगडले
सुमारे ५०-६० वर्षांपूर्वीच नासाने यावर अभ्यास सुरू केला होता. त्यावेळी जागतिक तापमानवाढ नव्हती, पण भूकंप आणि भूगर्भातील अंतर्गत हालचालींमुळे ध्रुव थरथरायचे. त्यावर त्यांनी अभ्यास केला होता. आता ते कारण नाही, पण तरीही ध्रुव का थरथरत आहेत, याचा उलगडा त्यांना होत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा नव्याने अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर हे सत्य त्यांच्या अभ्यासातून समोर आले.
प्रयत्न करा अन्यथा परिणाम भोगा -प्रा. चोपणे
जागतिक तापमानवाढीमुळे अवर्षण, अतिवर्षां, अल-निनो, ला-निनो, तापमानवाढ, अशा मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. आता या नव्या आश्चर्यकारक संशोधनामुळे भविष्यात काय होणार आहे, हे आजच सांगता येत नाही, पण कदाचित याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजेत अन्यथा, आपल्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे खगोल व पर्यावरण अभ्यासक, तसेच ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effects of global warming on the earth